राजकीय

राजकीय अस्तित्वासाठी नव्हे…जनतेच्या प्रश्नांसाठीची ही लढाई!

राजकीय अस्तित्वासाठी नव्हे…जनतेच्या प्रश्नांसाठीची ही लढाई!

 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर साधला निशाणा

सांगोला (प्रतिनिधी) : “ही निवडणूक कोणाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही, तर सांगोला शहराच्या जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी आहे,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत सांगोल्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली.
५ वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, त्यांचीच राज्यामध्ये पण सत्ता होती, सत्ता हातात असताना सांगोला शहराची दयनीय अवस्था का झाली? असा सवाल उपस्थित करुन नगरविकास खाते जरी तुमच्याकडे असले तरी सगळ्या खात्यांचा मालक आमच्याकडे आहे. त्यामुळे कुठे अडचण येण्याचे काही कारण नाही. गेले पाच वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामे का झाली नाहीत याचे उत्तर आधी शहाजीबापूंनी द्यावे, अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर आणि २३ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगोला शहरातून शक्ती प्रदर्शन करीत विशाल पदयात्रा काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, बाळासाहेब एरंडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे या पदयात्र सामील झाले होते. शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या सर्व महात्म्यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेत पालकमंत्र्यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला. यानंतर सांगोल्याचे आराध्य दैवत असणाऱ्या अंबिका माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, शहाजीबापू यांनीच आम्हाला एकटं पाडलं आहे. सगळ्यात आधी नगराध्यक्ष आणि पॅनल जाहीर करून बसले. त्यांना थोडेच निवडून यायचं होतं, त्यांना जे साधायचे ते त्यांनी साधले अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची फिरकी घेतली. सांगोलाच्या राजकारणात ना.जयकुमार गोरे यांचा व्यक्तीगत हस्तक्षेप कधीही होणार नाही. सांगोला तालुक्यातील समविचारी लोकांना सोबत घेऊन सांगोला शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे मत पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. येणाऱ्या निवडणुकीत खिलाडू वृत्तीने लढू व लोकांसमोर जाऊ, आम्ही आमचा अजेंडा लोकांपुढे ठेवू, तुम्ही तुमचा अजेंडा लोकांपुढे ठेवा. ५ वर्षात केलेले काम आणि मिळालेला मालपाणी याचा हिशोब लोकांना द्या, आम्ही सांगू आम्ही ५ वर्षात काय करु. सांगोला शहराचे कमिशन राज्य संपवायचे असेल तर आमच्या पॅनेलच्या पाठीमागे राहण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

एवढा निधी देऊन सांगोल्याचा विकास का नाही? याचे उत्तर शहाजीबापूंनी द्यावं. कोणाचे तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नाही म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंवर निशाणा साधला.  नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये सर्वच अलबेल नाही हे त्यांनीच दाखवून दिले. शहाजीबापू यांनी आधी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आणि मग युतीच्या चर्चा होत नाहीत असा कांगावा सुरू केल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. शहाजीबापूंनी आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असून त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या काळात केलेली काम का दिसत नाहीत? त्याचा दर्जा का नाही यावर चर्चा झाली पाहिजे अशी ही मागणीही गोरे यांनी केली. शेकाप भाजपसोबत आल्यामुळे आम्हाला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारासोबत काम करायची संधी मिळाल्याचे सांगत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे मारुतीआबा बनकर हे जनतेत किती लोकप्रिय आहेत हे आजच्या गर्दीवरून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!