पहिल्या खाजगी रेल्वेची इन साईड स्टोरी….बारसी लाईट रेल्वे कंपनी
मिरज–लातूर मार्गावरील बार्शी लाईट रेल्वेच्या देवाच्या गाडीचा थरारक इतिहास

पहिल्या खाजगी रेल्वेची इन साईड स्टोरी….बारसी लाईट रेल्वे कंपनी
मिरज–लातूर मार्गावरील बार्शी लाईट रेल्वेच्या देवाच्या गाडीचा थरारक इतिहास
सांगोला (प्रतिनिधी): बार्शी लाईट रेल्वे (बीएलआर) ही महाराष्ट्र राज्यातील मिरज आणि लातूर यांना जोडणारी २०२ मैल (३२५ किमी) लांबीची, २ फूट ६ इंच (७६२ मिमी) अरुंद गेज रेल्वे होती. या प्रकल्पाची कल्पना ब्रिटिश अभियंता एव्हरर्ड काल्थ्रॉप यांची होती. भारतातील अरुंद गेज रेल्वे बांधकामामध्ये क्रांती घडवणारा प्रकल्प म्हणून या रेल्वेचा गौरव केला जातो. १८८७ मध्ये त्यांनी लंडनमध्ये “इंडियन रेल्वेज फीडर लाइन्स कंपनी” नोंदणीकृत केली, ज्याचा उद्देश रेल्वेला जोडणाऱ्या फीडर मार्गांच्या बांधकामाला प्रोत्साहन देणे हा होता.

महाराष्ट्रात लातूर ते मिरज यादरम्यान धावणारी बारसी लाईट रेल्वे ही स्वातंत्र्यपूर्व काळातील खाजगी कंपनी असून बार्शीला मुंबई मद्रास लोहमार्गाला जोडण्यासाठी कुर्डूवाडी ते बार्शी या ३४ किमीसाठी एव्हरार्ड कॅल्थरॉप या बुद्धिमान इंजिनीअरने ईस्ट इंडिया कंपनीचा राजीनामा देऊन ११ जुलै १७९५ ला ‘बारसी लाईट रेल्वे कंपनी लिमिटेड, लंडन ( BLR )’ (Barsi Light Railway Company Limited London) नावाने ७० लाख १४ हजार ४७७ रुपयाचे भागभांडवल उभा करून खाजगी कंपनी स्थापन केली. कंपनीचे कार्यालय कायमस्वरूपी विंचेस्टर हाऊस ब्रॉडस्ट्रीट लंडन येथे राहिले.
कुर्डूवाडी बार्शी रस्त्यालगत फक्त ९ फुट रुंदीवर २ फुट ६ इंच रुंदीची नॅरोगेज रेल्वे १ मार्च १८९७ ला सुरू झाली. कंपनीचे भारतातील कार्यालय सुरूवातीला बार्शीत तर पुढे कुर्डूवाडीला राहिले. ए. एल. अलेक्झांडर यांची मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली. अलेक्झांडर आणि कॅल्थरॉप या जोडगोळीने रात्रीचा दिवस करून BLR ला सोन्याचे दिवस आणले. त्यांचा पगार होता २२०० आणि १५०० रुपये महिना.

सुरूवातीला फक्त बार्शी रोड ( कुर्डूवाडी ) ते बार्शीसाठी तयार झालेली ही रेल्वे वाढत वाढत १९२७ साली लातूर ते मिरज याप्रमाणे ३२३ किमी म्हणजे भारतातील सर्वात मोठी खाजगी नॅरोगेज रेल्वे झाली. सुरूवातीला प्रवाशाकडून कंपनीने किती तिकीट घ्यावे याचे दरही निश्चित केलेले असून त्यानुसार, फर्स्ट क्लास – २४ पैसे प्रती मैल, सेकंड – १२ पैसे, थर्ड – ८ पैसे, फोर्थ – ३ पैसे , घोड्यासाठी – २४ पैसे प्रती मैल , कुत्रे – ८ आणे प्रती ५० मैल, धान्य – ७ शेराखालील वजनासाठी ८ आणे प्रती ५० मैल, सोबत लगेज असेलतर ४ आणे असे दर होते. सुरूवातीला कंपनीने प्रती मैलासाठी ३५८५ युरो एवढा खर्च केला. यावेळी १ रुपयाची किंमत १६ डॉलर एवढी होती.
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे या गाडीला देवाची गाडी म्हटले जायचे. आषाढी एकादशीला तर अगदी मालगाडीचे डबे सोडले तरी रेल्वेच्या टपावरच नाहीतर इंजिनच्या पुढच्या बाजूलाही लोक बसलेले असायचे. यावेळी तिकीटधारक किती हा विषय गौण असायचा. याचा कंपनीला एकदा फटकाही बसला. १९११ च्या अहवालानुसार या गाडीने जून ते डिसेंबर १९११ या सहामाहीत ३ लाख ८७ हजार ०७० एवढ्या प्रवाशांची वाहतूक करत १२६.०३ पैसे प्रती मैल प्रती आठवडा या दराने ३ लाख १९ हजार ५५० रुपये जमा केले.

सुरूवातीला ही गाडी पंढरपूरला नदीच्या अलीकडेच थांबायची. त्यानंतर भीमा नदीवरील पूल आणि पुढील लाइनसाठी ८ लाख ६६ हजार रुपये खर्च केला, त्यामुळे पंढरपूरच्या रेल्वे पुलाचे ‘विलीग्टन पूल’ असे नाव होते. त्यानुसार केवळ बार्शी लाइट रेल्वे आली म्हणूनच कुर्डूवाडी गावाची निर्मिती झाली. खरंतर २३ आक्टोबर १९१४ पर्यंत कुर्डूवाडीला बारसी रोड असे नाव असून इंग्रजांनी बार्शीचा उच्चार शेवटपर्यंत Barsee व १८७० नंतर Barsi असाच केला. BLR कंपनीच्या १९१२ च्या प्राप्त वार्षिक अवहालानुसार नोव्हेबर १९११ ला होणारी कार्तिकी एकादशीची पंढरपूर यात्रा प्लेगमुळे तर त्यानंतर जुलै १९१२ ची आषाढी यात्रा कॉलरामुळे रद्द करावी लागली होती. म्हणजे १९११ ते १९१२ असे वर्षभर पंढरपूरचे मंदिर साथीच्या रोगामुळे बंदच असून नव्वद वर्षापूर्वीही लॉकडाऊन ही संकल्पना होती हे समजण्यास मदत होते. त्यामुळे अपेक्षित ४ लाख ५३ हजार ७६८ एवढे प्रवाशी न आल्यामुळे कंपनीला ४१ लाख ६५० रुपयाचा तोटा झाला.

१८९७ ला एखादी कंपनी काढून मोठा उद्योग उभा करण्यासाठी लोकामधून शेअरच्या माध्यमातून भांडवल उभे केले. १० युरोच्या प्रती शेअरसाठी ४ टक्के बोनस दिला जायचा. १९११-१२ ला साथीच्या रोगामुळे तर लगेच १९१४ च्या पहिल्या महायुद्धामुळे कंपनीला आर्थिक नुकसान झाले. तेव्हा लंडन सरकारच्यावतीने उभारलेल्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स फंडा’तून बार्सी लाइट रेल्वे कंपनीला ५०० युरोची आर्थिक मदत झाली. कंपनीसाठी लागणारी जमीन शासनाच्यावतीने मोफत देण्यात आली होती. १९३० ला कुर्डूवाडीला मोठे वर्कशॉप काढण्यात आले.
कोळशावर चालणाऱ्या इंजिनमुळे वाफ तयार व्हायला वेळ लागायचा म्हणून कधीकधी एखाद्या स्टेशनवर गाडी तासनतास थांबायची. पूर्वी गाडी येण्यापूर्वी विशेषत: जंगल परिसरात रेल्वेलाइनवर काही अडथळा तर नाही ना हे पाहण्यासाठी एक घोडेस्वार रेल्वे येण्यापूर्वी पुढे धावत जावून पाहणी करायचा. गाडीची गतीच एवढी कमी होती की, कधी कधी जनावरे आडवी आली तर ड्रायव्हर खाली उतरून जनावरे बाजूला हाकून मग गाडी पुढे जायचा.१ जानेवारी १९५४ ला भारतीय रेल मंत्रालयाने बार्शी लाइट रेल्वे कंपनी विकत घेतली. आजही काही ठिकाणी जुने रूळ, स्टेशनच्या नावाचे फलक तसेच पडून आहेत. या यादगार क्षणाचे सर्व श्रेय जाते, एव्हरार्ड कॅल्थरॉप नावाच्या ध्येयवेड्या इंजिनीअरला, ज्याने भारतात २ फूट ६ इंच रुंदीच्या रेल्वेचा प्रयोग करून तो सत्यात उतरविला.

नॅरोगेजवर रेल्वे मिरज ते कुर्डूवाडी अशी धावत होती. पंढरपूर यात्रेनिमित्त ही छोटी गाडी गाडीत नाही जागा मिळाली तर बरेच लोक गाडीच्या टपावर बसून पंढरपूर पर्यंत जात होते. पंढरपूरमध्ये ही गाडी पूर्णपणे रिकामी होत होती. प्रवास सुखाचा होता, त्या गाडीचा वेग मर्यादित होता वेग कमी असल्यामुळे गाडीचा अपघात होत नव्हता. माणसे सुखाने प्रवास करत होती. म्हणूनच नॅरोगेज गाडीला लोक म्हणत असे ही देवाची गाडी आहे. पूर्वी सिंगल लाईन असल्यामुळे क्रॉसिंग असेल त्या स्टेशनवर दूसरीगाडी येईपर्यंत अगोदर आलेली गाडी थांबत होती. त्यामुळे वेळ फार वाढत होता, दुसरी गाडी आल्याशिवाय सेक्शन क्लियर होत नव्हते. सेक्शन क्लिअर झाल्यानंतर थांबलेली गाडी सिग्नल देऊन लाईन क्लिअर देऊन पुढच्या प्रवासासाठी जात होती.

मिरजेहून रेल्वेने पंढरपूरला जाण्यासाठी पूर्वी नॅरोगेज रेल्वे मार्गावर धावणारी गाडी असायची. वारकऱ्यांमध्ये ही गाडी लोकप्रिय होती. दरवर्षी आषाढी यात्रेच्या अगोदर काही दिवस पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकऱ्यांची या गाडीला गर्दी होई. अनेक वारकरी गाडीच्या छतावर बसून प्रवास करीत. नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा वेग इतका कमी होता की, प्रवासी चालत्या गाडीतून खाली उतरून रेल्वे रूळालगतच्या शेतातील भुईमूग उपटून पुन्हा गाडीत बसत असत.
वारकऱ्यांची ही लाडकी रेल्वेगाडी ‘देवाची गाडी’ म्हणून ओळखली जाई. कोकण, कोल्हापूर, बेळगांव, सातारा, सांगली या जिल्हयातील हजारो वारकरी सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी याच देवाच्या गाडीला पसंती देत.

सन १९२७ मध्ये मिरज ते पंढरपूर या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू झाली. सन १९२१ ते १९२६ पर्यंत या मार्गासाठी जमिनी संपादन करण्यात आल्या. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी हद्दीत सुमारे २४ एकरहून अधिक जमीन कुमठेकर बंधूनी या रेल्वेसाठी दिल्याची नोंद तत्कालीन सांगली संस्थानच्या दफ्तरी नोंद आहे.
ही गाडी इतकी लोकप्रिय होती की देशाचे पहिले रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्रींनाही या गाडीने प्रवास करण्याचा मोह आवरला नाही. सन १९५५ च्या आषाढी यात्रेवेळी लालबहादूर शास्त्री यांनी मिरज ते पंढरपूर हा प्रवास याच गाडीने वारकऱ्यांसमवेत केला होता. सन २००७ पर्यंत ही गाडी नॅरोगेज मार्गावर सुरू होती. त्यांनतर चार वर्षांच्या खंडानंतर ही देवाची गाडी ब्रॉडगेज मार्गावरून वेगाने धावू लागली. गेल्या काही वर्षांत आषाढी यात्रेनिमित्त या गाडीच्या जादा फेऱ्या सोडण्यात येतात.
महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यातून जवळपास शतकभर धावणारी ‘बार्शी लाईट रेल्वे’ ही केवळ वाहतुकीचे साधन नव्हते, तर वारकरी संप्रदायाची जिवंत लोकवाहिनी होती. मिरज–लातूर या ३२५ किमीच्या मार्गावर धावणारी ही खाजगी नॅरोगेज रेल्वे स्वातंत्र्यपूर्व काळातील अभियांत्रिकी धाडस, व्यवस्थापन कौशल्य आणि भक्तीभावाचा अद्वितीय संगम मानली जाते. आज पंढरपूर स्थानकावर बार्शी लाईटचे प्रतीक म्हणून एक जुने लोकोमोटिव्ह सन्मानाने उभे आहे. तो काळाकुट्ट धूर, इंजिनची शिट्टी आणि वारकऱ्यांचा जयजयकार या साऱ्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत.



