“आम्ही तुफानातले दिवे!” सोशल मीडियावर इच्छुक उमेदवारांची धडाकेबाज एन्ट्री..!
'स्वयंयंघोषित’ उमेदवारांनी वाढवली नेत्यांची डोकेदुखी — बंडखोरीचीही शक्यता🔥

“आम्ही तुफानातले दिवे!” सोशल मीडियावर इच्छुक उमेदवारांची धडाकेबाज एन्ट्री..!
‘स्वयंयंघोषित’ उमेदवारांनी वाढवली नेत्यांची डोकेदुखी — बंडखोरीचीही शक्यता🔥
सांगोला (प्रतिनिधी): नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागल्याने सांगोल्यासह तालुक्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नुकतेच आरक्षण जाहीर होताच संभाव्य उमेदवारांनी तयारीला वेग दिला असून सोशल मीडियावर प्रचाराचा ‘तुफान’ उठले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि युट्यूबवर इच्छुकांची रील्स, पोस्टर्स आणि ग्राफिक्सची झंकार सुरू असून मतदारांच्या मनावर राज्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आजच्या काळात सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी आणि जलद माध्यम ठरले आहे. याचाच फायदा घेत इच्छुक उमेदवार स्वतःची छबी मतदार व पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोशल मीडिया हे अलीकडील काळात अत्यंत प्रभावी आणि जलद माध्यम झाले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी कालावधी आणि कमी कष्ट लागणारे हे माध्यम असल्याने इच्छुक उमेदवार मतदारांच्या मनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहेत. बायोग्राफी, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट आणि केलेल्या कामांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपली इच्छा व्यक्त करीत आहेत.
सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवून एक वेगळा ठसा पक्ष आणि पक्षश्रेष्ठींवर पाडण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावर रिल्स, पोस्टर, स्टेटस, पोस्टच्या माध्यमातून आता इच्छुक लढण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
“सेवा आणि कर्तव्य हाच धर्म”, “एक संधी नव्या नेतृत्वाला”, “आम्ही तुफानातले दिवे” अशी घोषवाक्ये देत विविध रील्स, बायोग्राफी, डॉक्युमेंटरी आणि प्रचार व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

डिजिटल रणांगणावर उमेदवारांची झुंबड..!
मागील सर्व निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचून आपली विकासकामे, कर्तृत्व आणि ओळख पोहोचविण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत होती. मागील निवडणुकांप्रमाणे घराघरांत जाऊन पत्रके व वचननामे वाटण्यापेक्षा आता केवळ एका क्लिकवर हजारो मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. त्यामुळे या वेळची निवडणूक “डिजिटल रणांगणावर लढली जाणारी” ठरणार, असेच चित्र दिसते आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स आणि व्ह्यूजच्या स्पर्धेत प्रत्येक इच्छुक ‘तुफानातला दिवा’ ठरण्याचा प्रयत्न करत आहे.
‘फिक्स सदस्य’ची तयारी सुरू!
अजून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायचा असतानाही काहींनी स्वतःला ‘भावी सदस्य’ किंवा ‘जनतेचा सेवक’ म्हणून जाहीर केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा फलकांपासून जनतेपर्यंत थेट संवाद साधणाऱ्या रील्सपर्यंत सर्वत्र त्यांच्या पोस्टरबाजीचा बोलबाला आहे. प्रत्येक गट, गण आणि मतदारसंघात स्वतःसाठी योग्य जागा शोधून उमेदवारांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे.
पक्षांतील गोंधळ आणि बंडखोरीची चाहूल
अजून अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने अनेक ठिकाणी पक्षांतर्गत गोंधळ आणि स्पर्धा वाढली आहे. कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही, या पेचात नेते अडकले आहेत. काहींना माघार घेण्यास सांगणे अवघड ठरणार असून यातून बंडखोरीची शक्यता बळावत आहे.
महायुती, आघाडी की स्वतंत्र उमेदवार?
या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगोला परिसरात महायुती विरुद्ध महायुती किंवा महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. काही इच्छुक सर्वपक्षीय भूमिका घेत स्वतःचा प्रचार डिजिटल पद्धतीने करत आहेत. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होते आणि कोण खऱ्या अर्थाने ‘तुफानातला दिवा’ ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वचननामे, पॅपलेट्स, स्टिकर याच्या पलीकडे जाऊन आला फक्त एका क्लिकवर हजारो मतदारांपर्यंत पोहोचता येत आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता सोशल प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. इच्छुकांना संधी मिळण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आणि पक्षश्रेठींकडे उमेदवारी मिळण्यासाठी वर्णी लावण्यासाठी याचा किती फायदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इच्छुकांची संख्या पाहता ज्याचे फॉलोअर्स जास्त ज्याचे व्हीवर्स जास्त तो प्रभावशाही ठरणार आहे.
इच्छुक ठरले तुफानातले दिवे..
आमची तळमळ विकासाची, वादळवाऱ्याने मावळणारे आम्ही नव्हे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, एक संधी नव्या पर्वाला- एक संधी नव्या नेतृत्वाला, सेवा आणि कर्तव्य हाच माझा धर्म, साधी राहणी उच्च विचार आणि सतत संपर्कात, आता थांबायचं नाय, Mission २०२५, लवकरचं येतोय आपला आशिर्वाद घ्यायला, बदल हवा आहे चेहरा नवा आहे अशा आशयाचे पोस्टर आणि रिल्स व्हायरल केले जात आहेत.
स्थानिक पातळीवर महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत. सध्या कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल हे निश्चित नसल्याने बहुतेक इच्छुक सर्वपक्षीय भूमिका घेत आपला प्रचार सोशल मीडियावर रंगवत आहेत. महायुती, आघाडी की स्वतंत्र उमेदवारी हे समीकरण पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.


