सोलापुरात राजकीय भूकंप..भाजपाचा मास्टरस्ट्रोक..ऑपरेशन लोटस यशस्वी!

सोलापुरात राजकीय भूकंप..भाजपाचा मास्टरस्ट्रोक..ऑपरेशन लोटस यशस्वी!
सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी केले आहे. सध्या राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला असून तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राज्यात निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु असते. भाजपचे ऑपरेशन लोटस सोलापूरमध्ये यशस्वी होताना दिसत आहे. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचा बुधवार २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप मध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३० हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता. या पराभवानंतर रणजितसिंह शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रणजितसिंह शिंदे यांचा हा निर्णय माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरणार आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे हे मागील तीस वर्ष माढा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर मागील विधानसभेला त्यांनी त्यांचा मुलगा रणजीतसिंह शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती. परंतु आता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माेहाेळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणेही बदलणार आहेत. माेहाेळ मतदारसंघातील माेठी ताकद असलेले राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माेहाेळ मतदारसंघ हा आरक्षित आहे. राजन पाटील साेबत असतील ताे उमेदवार निवडून येताे असा आजवरचा येथील इतिहास हाेता.
सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भाजपच्या हालचालींना बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ऑपरेशन लोटसमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे या तिघांचा बुधवारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सोलापुरात पक्षसंघटना मजबूत ठेवण्याबाबत मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कारण त्यांच्या पक्षाचे तब्बल तीन माजी आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र त्यांना डॅमेज कंट्रोल करणे शक्य झाले नाही.
सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने ऑपरेशन लोटस सुरू करून आजी माजी आमदारांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या भाजपकडे राहाव्यात यासाठी या सर्व पक्षप्रवेशाची सुरुवात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती. मागील काही थोडे दिवस माध्यमांमध्ये याची मोठी चर्चा असल्यामुळे या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील पक्षप्रवेश सुरू करण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शत प्रतिशत यश मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून विरोधी पक्षांसह मित्रपक्षातीलही माजी लोकप्रतिनिधी, नेते, स्थानिक नेत्यांना पक्षाचे दरवाजे उघडले आहेत.



