सोलापूर जिल्ह्यात विक्रमी 685 मिलीमीटर पाऊस
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

सोलापूर जिल्ह्यात विक्रमी 685 मिलीमीटर पाऊस
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात यंदा विक्रमी 685 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत हा पाऊस नोंदला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 65 मिलिमीटर एवढा पाऊस जास्त पडला आहे.
यंदाच्या वर्षी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी पाऊस हा माळशिरस तालुक्यात पडला आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी पट्ट्यात येणार्या जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने हा जिल्हा रब्बीचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. मात्र मागील काही वर्षाचा विचार केला असता त्यामध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान 481 मिलिमीटर एवढे आहे. असे असतानाही जिल्ह्यात प्रत्यक्षात मात्र 685 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 65 मिलिमीटर अधिकचा पाऊस पडला आहे. यावरून निसर्गचक्रामध्ये सातत्याने बदल होताना दिसून येत आहे.
या सर्वाधिक पावसामुळे खरीप हंगामाची अक्षरशा वाट लागली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम 100 टक्के वाया गेला आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप वाया जात असताना सप्टेंबर महिन्यात पुराने हाहाकार माजवला. जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सीना, भोगावती, भीमा या नद्या यंदा दुधडी भरून वाहिल्या.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. म्हणजे केवळ अतिवृष्टीनेच नव्हे तर यंदा सीना नदीला आलेल्या पुरामुळेही शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 481 मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो. मात्र यंदाच्या वर्षी 685 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. मागील वर्षी हाच पाऊस 620 मिलिमीटर एवढा पडला होता.
दक्षिण सोलापुरात विक्रमी 930 मिलिमीटर पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वाधिक 930 मिलिमीटर पाऊस दक्षिण सोलापूर तालुक्यात झाला आहे. त्या खालोखाल अक्कलकोट तालुक्यात 896 मिलिमीटर तर उत्तर सोलापूर तालुक्यात 832 मिलिमीटर एवढ्या पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या तीनही तालुक्याचा विचार केला असता त्यांचा वार्षिक सरासरी पाऊस साधारण 550 मिलिमीटर पाऊस एवढा आहे. मात्र प्रत्यक्षात 850 ते 950 मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद या तीन तालुक्यांमध्ये झाली आहे. सर्वात कमी 504 मिलिमीटर पाऊस माळशिरस तालुक्यात झाला आहे.