
सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये स्वराज्य राजमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
सांगोला (प्रतिनिधी): भारताचे महान सुपुत्र आणि आध्यात्मिक क्रांतीचे जनक स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या संकल्पनेच्या पहिल्या शिल्पकार राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची ४२८वी जयंती सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे कॉलेजमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयात राष्ट्रीय युवक सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त चि.विश्वजित दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून सप्ताहाची सुरवात झाली. यावेळी डी.फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.भारती मोटे हिने आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना, स्वामी विवेकानंद हे महान भारतीय संत, योगी आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्मदिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो, हा दिवस तरुणांसाठी प्रेरणादायी दिवस मानला जातो, कारण स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात मांडलेले विचार आणि तत्त्वे आजही तरुणांसाठी मार्गदर्शनाचा स्रोत आहेत. स्वामी विवेकानंदांनी नेहमीच तरुणांना शक्ती, स्वावलंबन आणि समाजाप्रती जबाबदारीचा संदेश दिला. राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश भारतातील तरुणांना प्रेरणा देणे आणि त्यांना त्यांच्या जीवनाच्या ध्येयांची जाणीव करून देणे हा आहे. राजमाता जिजाऊ यांनी बालवयापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात धर्म, स्वराज्य, न्याय आणि जनतेप्रती कर्तव्याची जाणीव रुजवली. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा, पराक्रमाची शिकवण आणि मातृभूमीप्रती निष्ठा या मूल्यांचा पाया जिजाऊंनीच घातला. जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला शिवाजी महाराजांचा नेतृत्वगुण साम्राज्याचा आधार ठरला. युद्धकौशल्याइतकेच नीतिमूल्ये, प्रजेचा सन्मान आणि स्त्रियांचा आदर यावर त्यांनी भर दिला. म्हणूनच राजमाता जिजाऊ यांचे कार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते असे मत व्यक्त केले.
यांनतर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, नागरिक व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कॉलेज परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमास महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.एस.पी.जोकार, प्रा.ए.व्ही.सपाटे, सांस्कृतिक विभागाचे डॉ.एन.ए.तांबोळी व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती..



