अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या : डॉ. परेश खंडागळे यांची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या : डॉ. परेश खंडागळे यांची मागणी
सांगोला (प्रतिनिधी) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांची हानी, तसेच विजेच्या उपकरणांची हानी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. परेश खंडागळे यांनी सरकार व प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या तातडीच्या दहा मागण्या सविस्तर मांडल्या आहेत.
डॉ. परेश खंडागळे म्हणाले की, “आज शेतकरी बांधव अतिशय मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम केवळ शेतावरच नाही तर संपूर्ण ग्रामीण जीवनावर झाला आहे. शासन व प्रशासनाने सकारात्मक पावले उचलून दिलासा दिला नाही, तर शेतकरी उभारी घेणे कठीण होईल.”
त्यांनी पुढील ठोस मागण्या केल्या आहेत :
1️⃣ सरसकट पंचनामे – अतिवृष्टी झालेल्या सर्वच भागांमध्ये तातडीने व निष्पक्ष पंचनामे करण्यात यावेत.
2️⃣ संपूर्ण कर्जमाफी – शेतकऱ्यांची सर्व थकित कर्जे माफ करून त्यांना दिलासा द्यावा.
3️⃣ ओला दुष्काळ जाहीर – सद्यस्थितीत तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
4️⃣ अनुदान वाढवून मिळावे – नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार वाढवावी.
5️⃣ वसुली थांबवावी – बँक कर्जवसुली, शैक्षणिक फी व महसूल कर वसुली थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
6️⃣ दिवाळी पॅकेज – दसरा व दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना विशेष दिवाळी पॅकेज व किट वाटप करण्यात यावे.
7️⃣ जनावरांचा मोबदला – अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या जनावरांसाठी योग्य मोबदला द्यावा.
8️⃣ वीज उपकरण मदत – विजेच्या उपकरणांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून मदत मिळावी.
9️⃣ वीज दुरुस्ती कामे – विद्युत मंडळाने लाईटचे पोल व डीपी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत.
🔟 घरांच्या नुकसानीस मदत – अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या किंवा पडझड झालेल्या घरांसाठी त्वरित मदत द्यावी.
डॉ. परेश खंडागळे यांनी यावेळी सांगितले की, “शेतकरी बांधवांच्या मागण्या केवळ न्याय्य नाहीत तर काळाची गरज आहेत. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तत्काळ निर्णय घेतले, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असे त्यांनी सांगितले.