उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू असून ३१ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. उद्यापासून म्हणजेच १ सप्टेंबर पासून आणखी कडक उपोषण करणार असून आता पाणी घेणंही बंद करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘उद्यापासून पाणी पिणं बंद करत कडक आमरण उपोषण सुरू करणार आहे.’, अशी घोषणा केली. “तुम्हाला काय करायचं आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. तसेच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज घरी राहत नसतो. हे लक्षात ठेवा. आपण जे बोलतो तो करतो. तुम्ही फक्त पुढील शनिवारी आणि रविवारी पाहा. उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहे. आता उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘मराठा समजााच्या एकाही पोराने दगडफेक करायची नाही. समाजाला मान खाली घालावी लागेल असे एकही पाऊल उचलायचे नाही. त्यांनी अन्याय करू द्या, तुम्ही शांत राहा. मी आरक्षण मिळवून देणार, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. तुम्ही फक्त शांत राहा. मनोज जरांगेंनी पुढे सांगितले की, ‘गोरगरिबांच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे मुंबईत आले आहे.
राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा देत, उद्यापासून पाण्याच्या एकाही थेंबाला स्पर्श करणार नसल्याचे जाहीर केले आहे. सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, त्यांनी आता ‘आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही’ ही भूमिका अधिक कठोर केली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “काल मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली, तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिले, असे ऐकले. मग ज्यांना आदेश दिले, ते मार्ग का काढत नाहीत? उपसमितीला आदेश देऊनही काहीच होत नाहीये. नुसत्या बैठका घेत आहेत, पण आता बैठका खूप झाल्या. असं त्यांनी म्हटलं आहे..