मटन भाकरी हॉटेलमध्ये जेवणाऐवजी जुगार खेळण्यासाठी गर्दी…
२ कोटी ६८ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त, ५० जणांवर गुन्हा दाखल

मटन भाकरी हॉटेलमध्ये जेवणाऐवजी जुगार खेळण्यासाठी गर्दी…
२ कोटी ६८ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त, ५० जणांवर गुन्हा दाखल
सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील सोनंद येथील हॉटेल मटण भाकरी या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये ५२ पत्त्यांच्या पानांवर पैशांची पैज लावून अवैधरित्या जुगार खेळताना ५० इसमांना जागीच रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून १६ लाख ९ हजार ४८० रुपयांची रोकड, २६ चारचाकी वाहने, ६१ मोटरसायकली, ६२ मोबाईलसह देशी विदेशी दारू असा सुमारे २ कोटी ६८ लाख ७२ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगोला तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सोनंद ता.सांगोला येथील एका हॉटेलच्या खोलीत सचिन साहेबराव काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) व शंभूलिंग प्रकाश तेरदाळ (रा. अथणी, जि. बेळगाव) हे दोघेजण जुगार क्लब चालवत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्यासह पोलिसांच्या पथकासमवेत त्या हॉटेल पाठीमागील सिमेंटच्या पत्राशेडमध्ये अचानक छापा टाकून सुमारे ५० व्यक्ती हे ५२ पत्त्यांच्या पानांवर पैशांची पैज लावून जुगार खेळत असताना आरोपींना रंगेहाथ पकडले. तसेच कसिनो काउंटरमध्ये अवैधरीत्या बेकायदेशीर देशी-विदेशी दारु ही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेले आहेत.
पोलीस आल्याचे समजताच जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे त्यांची पळापळ निष्फळ ठरली.
पोलिसांनी या कारवाईत १६ लाख ९ हजार ४८० रुपये रोख रक्कम, १३ लाख ९१ हजार १०० रुपये किमतीचे ६२ मोबाईल, २ कोटी ९ लाख रुपयांची २६ चारचाकी वाहने, २९ लाख ६० हजारांच्या ६१ दुचाकी, ११ हजार ११५ रुपयांची देशी विदेशी दारू असा एकूण २ कोटी ६८ लाख ७२ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस वरील ५० इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४,५ व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक विभावरी रेळेकर, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, पोलीस हवालदार निलेश रोगे, पोलीस हवालदार कामतकर, पोलीस हेड कॉन्स्टेवल मंगेश रोकडे, पोलीस हवालदार सुजित उबाळे, पोलीस हवालदार अरुण कोळवले, पोलीस हवालदार सातव, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शीतल राऊत, पोलीस नाईक संतोष गायकवाड, पोलीस नाईक सीताराम चव्हाण, पोलीस नाईक शिंदे, पोलीस नाईक ढोणे, पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल आवटे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मदने, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती यांच्या पथकाने केली.