“लग्न, शेती विक्रीचा वाद… आणि मुलाच्या हातून वडिलांचा खून !”
शेती विक्रीच्या वादातून वडिलांची निर्घृण हत्या; लोखंडी पाईपने ठेचून मारल्याची मुलाची कबुली

“लग्न, शेती विक्रीचा वाद… आणि मुलाच्या हातून वडिलांचा खून !”
शेती विक्रीच्या वादातून वडिलांची निर्घृण हत्या; लोखंडी पाईपने ठेचून मारल्याची मुलाची कबुली
सांगोला (प्रतिनिधी): शेती विक्री आणि कर्जाच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची लोखंडी पाईपने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे (पाटील वस्ती) येथे घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. रमेश बटू कुंभार (वय ५५) रा.वाकी शिवणे ता.सांगोला असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मयत रमेश कुंभार याच्या पत्नी समाबाई कुंभार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकी शिवणे येथील रहिवासी रमेश बटू कुंभार (वय ५५) हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी समाबाई, मुलगा अतुल रमेश कुंभार तसेच दुसरा मुलगा चैतन्य रमेश कुंभार असा परिवार आहे. चैतन्य हा उच्चशिक्षित असून बिहार राज्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कोरोना काळात त्याने बिहार येथील अंकिता नावाच्या युवतीशी प्रेमविवाह केला होता.
दरम्यान, कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे रमेश कुंभार यांनी बँकेतून सुमारे १७ लाख रुपये तर सोसायटीकडून सुमारे ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी आपल्या नावावरील चार एकर शेती विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला मुलगा अतुल याचा तीव्र विरोध होता. या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक ९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता वीज आल्यानंतर पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार शेतात गेले होते. त्यावेळी मुलगा अतुल देखील शेतातील डाळिंबाच्या झाडांना औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या तुकाराम मोहिते यांनी “तुमच्या शेतातून रमेश कुंभार यांच्या ओरडण्याचा आवाज आला,” अशी माहिती कुटुंबीयांना दिली.
यानंतर कुटुंबीयांनी तातडीने शेताकडे धाव घेतली असता रमेश कुंभार हे डोक्यावर, तोंडावर आणि पायावर गंभीर मारहाण झालेल्या अवस्थेत मृत पडलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुलगा अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने लोखंडी पाईपने मारहाण करून वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिल्याचे समोर आले. प्राथमिक चौकशीत शेती विक्री, बँकेचे कर्ज आणि घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मयत रमेश कुंभार यांच्या पत्नी समाबाई कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अतुल रमेश कुंभार याच्या विरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



