“तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेऊ”
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न, जिल्ह्यात खळबळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

“तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेऊ”
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न, जिल्ह्यात खळबळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी): राजकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशांचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. “तुला पैसे देतो, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेतो, यात तुझा फायदा आहे,” असे सांगून चालकाला आमदाराच्या हत्येसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

अक्कलकोट विधानसभेचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या आमदाराच्या हत्येची सुपारी थेट त्यांच्याच वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवून देण्याचा प्रयत्न झाला आहे.
याप्रकरणी वाहन चालक आनंद स्वामीराव सुरवसे, रा. मु.पो. मोटयाळ, ता. अक्कलकोट यांनी सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीशैल हळ्ळी व फुलारी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत वाहन चालक आनंद स्वामीराव सुरवसे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी व मुलगा यांना एम.एच-१३ ई.डब्यु ४७८९ या गाडीतून सोलापूर शहरातील महावीर चौकातील एका शोरुममध्ये खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर वाहन चालक आनंद सुरवसे बाहेरच थांबले होते. त्यानंतर श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे दोन संशयित तिथे आले. त्यांनी थेट चालकाला गाठून एक धक्कादायक ऑफर दिली. त्यापैकी एका इसमाने “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदारला गोळी घालून मार, मी पुढचे बघुन घेतो” असे म्हटले. त्याच्यासोबत असणाऱ्या इसमाने “तुला साहेब काय म्हणतात ते निट ऐक, त्यात तुझा फायदा आहे” असे म्हणाला. त्या दोघांचे ते बोलणे ऐकल्यानंतर आनंद सुरवसे यांना धक्काच बसला. त्यावेळी त्यांनी “मी आमदार साहेबांकडे कामास आहे, तुम्ही मला असे कसे बोलत आहे असे म्हणाले. त्याने तात्काळ या गोष्टीला ठामपणे नकार दिला आणि त्या दोघांना जाब विचारण्यास सुरुवात केली. परिस्थिती अंगावर येत असल्याचे पाहून श्रीशैल हुळळी आणि फुलारी यांनी तिथून तत्काळ पळ काढला. त्यानंतर सुरवसे घाबरल्याने त्यांना अधिक काही न बोलता गाडीत जाऊन बसले.
त्यानंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे पी.ए. सिध्दाराम माळी यांना मोबाईलवर संपर्क करून सदरची सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी त्यांनी त्यांचे सोबत असलेले आमदार साहेबांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांना फोन दिला. त्यावेळी सुरवसे यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. ८ ऑगस्ट रोजी आमदार कल्याणशेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याणशेट्टी यांनी शोरुम येथील घटनेबाबत विचारणा केली. आनंद सुरवसे यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी त्यांनी शोरुम येथील सीसीटीव्ही फुटेज सुरवसे दाखवून इसमांना ओळख पटविण्यास सांगितले. त्यावेळी गाडीतून गेलेले इसम श्रीशैल हुळ्ळी व फुलारी नावाचा इसम असल्याचे समजले.
सदर इसमांकडून भविष्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता असल्याने व कोणतीही वाईट इतर घटना घडू नये म्हणून आनंद सुरवसे यांनी सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात श्रीशैल हळ्ळी व फुलारी या दोघांविरुध्द फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा केवळ पैशांचा मोह दाखवून केलेला प्रयत्न होता की यामागे काही मोठे राजकीय षडयंत्र आहे, याचा सखोल तपास सोलापूर पोलीस करत आहेत. आरोपींच्या मागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रकरणाचा जलद गतीने तपास करण्याची मागणी होत आहे.



