देवाभाऊ जनआरोग्य अभियान जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – चेतनसिंह केदार सावंत

देवाभाऊ जनआरोग्य अभियान जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (प्रतिनिधी): ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ राबविण्यात येत असून, या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ नाझरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.
शिक्षण व सभापती चेतनसिंह केदार सावंत हे स्वतः या अभियानाचे नेतृत्व करत असून, प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सखोल आढावा घेणार आहेत. अभियानातील त्रुटींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे.
नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान माता व बाल आरोग्य योजना, आयुष्मान आरोग्य मंदिराच्या १३ सर्वसमावेशक सेवा, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सार्वत्रिक लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किशोर आरोग्य, कुटुंब नियोजन, अँनिमियामुक्त भारत अभियान, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन, मलेरिया, डेंग्यू व फायलरिया नियंत्रण, असंसर्गजन्य रोग तपासणी, मानसिक आरोग्य सेवा, आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, रोग सर्वेक्षण (IDSP), मोफत औषध वितरण, प्रयोगशाळा सेवा, विविध तपासण्या तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, जनआरोग्य समिती (JAS) सदस्य, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या सर्व आरोग्य योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सेवा वितरणातील त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.या अभियानामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट होऊन सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस सांगोला पंचायत समितीचे उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते, विस्तार अधिकारी जयंत टकले, सुरेश चौगुले, भाऊ पाटील, सुरेश आदाटे, विजयकुमार जावीर, रमेश पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील, रियाज काझी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



