सामाजिक

केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेत यशस्वी शिक्षकांचा सांगोल्यात भव्य सत्कार

कृष्णाई क्रेडिट सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; मार्गदर्शन, सन्मान आणि प्रेरणेचा संगम

केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेत यशस्वी शिक्षकांचा सांगोल्यात भव्य सत्कार

कृष्णाई क्रेडिट सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; मार्गदर्शन, सन्मान आणि प्रेरणेचा संगम

सांगोला (प्रतिनिधी): शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या शिक्षकांचा कृष्णाई महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ली. सांगोला यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून इतरांना प्रेरणा देण्याचा स्तुत्य उपक्रम संस्थेने राबविला.

यावेळी असिफ नदाफ, आमिर तांबोळी, रणजीत शिंदे, लक्ष्मण लिगाडे, राहुल भालशंकर यांची केंद्र प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक साहेबराव पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी सहसंस्थापक नितीन खटकाळे, तसेच संजय मुंडे, सचिन आदलिंगे, राहुल टकले, राजेंद्र शिंदे, नितीन बनसोडे, नागनाथ घोडके, धनाजी सांगोलकर, रामेश्वर शिंदे आणि उद्योजक वैभव पाटील यांच्यासह अनेक शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गायकवाड यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक असून सातत्यपूर्ण अभ्यास, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावरच यश मिळू शकते. यशस्वी शिक्षकांचा सत्कार करून इतर शिक्षकांमध्येही स्पर्धा परीक्षेबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मार्गदर्शन करताना संजय मुंडे यांनी शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवावी असे सांगितले. स्पर्धा परीक्षेद्वारे मिळणारी पदे ही केवळ पदोन्नती नसून शिक्षण व्यवस्थेत नेतृत्व करण्याची संधी असते. त्यामुळे शिक्षकांनी अभ्यासाची सवय कायम ठेवून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षकांना मोठी प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून यशस्वी शिक्षकांचे कौतुक करत ग्रामीण भागातूनही गुणवंत शिक्षक पुढे येत असल्याचा अभिमान व्यक्त केला. अशा प्रकारचे सत्कार समारंभ आयोजित केल्याने शैक्षणिक वातावरण सकारात्मक राहते आणि तरुण शिक्षकांना नवी दिशा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सहसंस्थापक नितीन खटकाळे यांनी आभार प्रदर्शन केले. या सत्कार समारंभामुळे सांगोला तालुक्यातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा देण्याबाबत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!