
सांगोला नगरपरिषदेच्या स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडी संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषद स्थायी समिती व विषय समितीच्या निवडी संदर्भात विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे संपन्न झाली.
नियोजन व विकास समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, पाणीपुरवठा व जल:निस्सारण समिती, महिला व बालकल्याण समिती अशा ५ विषय समिती निश्चित करून प्रत्येक विषय समितीमध्ये ५ सदस्य व महिला व बालकल्याण समितीमध्ये ६ सदस्य निश्चित करण्यात आले. तसेच स्थायी समितीमध्ये ७ सदस्यांची संख्या निश्चित करून उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असल्याचे निश्चित करण्यात आले.
यानंतर विषय समित्यांसाठी शिवसेना पक्षामार्फत व सांगोला शहर विकास आघाडीमार्फत नामनिर्देशन दाखल करण्यात आले. सदर नामनिर्देशनपत्रांची छाननी पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी यांनी केली व सदर नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे जाहीर केले. यानंतर विषय समिती सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली. प्रत्येक विषय समिती सभापतीपदासाठी केवळ एकच नामनिर्देशनपत्र प्राप्त झाल्याने खालीलप्रमाणे बिनविरोध सभापती निवड घोषित करण्यात आली.
नियोजन व विकास समिती पदसिद्ध सभापती – श्री. नितीन विठ्ठल इंगोले, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – श्री. ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती – सौ. गोदाबाई भारत बनसोडे, पाणीपुरवठा व जल:निस्सारण समिती सभापती – सौ. वैशाली सतीश सावंत, महिला व बालकल्याण समिती सभापती – सौ. छायाताई सुर्यकांत मेटकरी, महिला व बालकल्याण समिती उपसभापती – सौ. सीमा समाधान सरगर
तद्नंतर स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती हे नगराध्यक्ष असल्याने श्री. आनंदाभाऊ माने यांची स्थायी समिती सभापतीपदी नेमणूक झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी घोषित केले. तसेच स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य हे प्रत्येक विषय समित्यांचे सभापती असल्याने व स्थायी समिती ही ७ सदस्यांची निश्चित केली असल्याने स्थायी समितीवर शिवसेना पक्षामार्फत श्री. प्रशांत बबन धनवजीर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे दुःखद अपघाती निधन झाल्याने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच नगराध्यक्ष श्री. आनंदाभाऊ माने, उपनगराध्यक्ष श्री. नितीन इंगोले, पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सर्व नगरसेवक यांनी नवनियुक्त सभापती व विषय समिती सदस्य यांचे अभिनंदन केले.



