शासकीय विश्रामगृह परिसरातील महादेव मंदिर घाणीच्या विळख्यात
स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; शिवसेना नेते सोमेश यावलकर यांचा टाळे ठोकण्याचा इशारा

शासकीय विश्रामगृह परिसरातील महादेव मंदिर घाणीच्या विळख्यात
स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शिवसेना नेते सोमेश यावलकर यांचा टाळे ठोकण्याचा इशारा
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात असलेले व अनेकांचे श्रद्धास्थान असलेले महादेव मंदिर सध्या अस्वच्छतेच्या साम्राज्यात अडकले असून, या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते सोमेश यावलकर यांचेसह नागरिक व भाविकांकडून करण्यात येत आहे.
या परिसरात शासकीय विश्रामगृहासारखी महत्त्वाची इमारत असतानाही आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा, दुर्गंधी व अस्वच्छता पसरलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे, महादेव मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज तसेच सण-उत्सवांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. मात्र अशा पवित्र ठिकाणी घाणीचे साम्राज्य असणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.
मंदिर परिसरातील अस्वच्छतेमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सांगोला शहरातील युवानेते सोमेश यावलकर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. तात्काळ मंदिर व परिसराची स्वच्छता न केल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. महादेव मंदिरासारख्या श्रद्धास्थानाची स्वच्छता राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून, याबाबत तत्काळ उपाययोजना करून नियमित साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी भाविक व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. आता प्रशासन या गंभीर बाबीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



