उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार 2025 ने संतोष यादव यांचा गौरव

उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार 2025 ने संतोष यादव यांचा गौरव
सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील शेतकरी, युवक आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेली पंधरा वर्षे अविरत कार्यरत असलेल्या सांगोला येथील संतोष यादव यांना ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार 2025’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
संतोष यादव हे गेल्या दीड दशकांपासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी बँकिंग सेवा दारापर्यंत पोहोचवण्याचे भरीव काम केले आहे. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक हजार शेतकऱ्यांना बँकिंग पतपुरवठा करण्यात आला असून त्यामुळे अनेक शेतकरी सावकारांच्या जोखडातून मुक्त झाले आहेत.
शेतीला पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी, दुग्धव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, लघुउद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आर्थिक मदत मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीच्या शोधात शहरांकडे न वळता स्वतःचा व्यवसाय व उद्योग उभा करता यावा, यासाठी त्यांनी आर्थिक पतपुरवठ्यासोबतच सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
ग्रामीण भागातील युवकांना व्यवसायात उस्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत, घराघरात बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी बँकिंग नेटवर्क विस्ताराचे कामही त्यांनी प्रभावीपणे केले. त्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता वाढीस लागली असून स्वावलंबनाची नवी दिशा निर्माण झाली आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना संतोष यादव म्हणाले,
“शेतकरी आणि ग्रामीण युवक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, सावकारांच्या कर्जापासून मुक्त व्हावेत आणि बँकिंग व्यवस्थेशी जोडले जावेत, हाच माझा उद्देश आहे. मिळालेला सन्मान ही माझ्या कामाची पोचपावती असून, भविष्यातही असेच कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणा देणारा आहे.” ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या कार्यामुळे संतोष यादव यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांचा हा सन्मान सांगोला तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.



