शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार; महामार्गानंतर आता रेल्वे रोकोचा इशारा
शेतकरी कर्जमुक्त आंदोलन तापलं, बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार; महामार्गानंतर आता रेल्वे रोकोचा इशारा
शेतकरी कर्जमुक्त आंदोलन तापलं, बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम
सांगोला (प्रतिनिधी): आमची चर्चेची तयारी आहे. चर्चेचे दार आम्ही बंद केलेले नाही, ते सरकारने बंद केले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर रेल्वे रोखून दाखवू, असा आक्रमक पवित्रा आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेत सरकारला अल्टीमेटम दिलं आहे. नागपूरमध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी भव्य मोर्चा काढलाय. अद्याप बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच असून अजूनही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चार मुख्य महामार्ग रोखून धरला आहे.
दरम्यान, आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे. २८ ऑक्टोबरची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावरच काढली आहे. त्यामुळे येत्या 12 वाजेपर्यंत सरकार नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालची रात्र जामठा स्टेडियम जवळ महामार्गावरच झोपून काढली आहे. अजूनही बच्चू कडू यांच्यासोबत शेकडो आंदोलन महामार्गावर बसून आहेत. त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. शिवाय जामठा येथून जाणाऱ्या जबलपूर हैदराबाद महामार्गावर ही आंदोलन बसल्याने काही अंशी त्या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे. लोकांची कोंडी होत असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे, त्याचं काय? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. चर्चेसाठी कृषिमंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं अशी आमची अपेक्षा नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे कर्जमाफी मिळावी ही अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
नागपूर – वर्धा आणि जबलपूर – हैदराबाद महामार्ग बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.. त्यामुळे खाजगी वाहनांनी किंवा एसटी बसेसने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.. तसेच धान्य, दूध, भाजीपाला, व इतर अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे अनेक ट्रक्स ही महामार्गांवर थांबून आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून
प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकर तोडगा काढावा अशी भावना व्यक्त केली
जात आहे.
बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांमुळे फक्त नागपूर – वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही, तर एका बाजूला नागपूर-अमरावती आणि दुसऱ्या बाजूला नागपूर – रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर ही आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आऊटर रिंग रोडवर ही कित्येक किलोमीटरपर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.
विविध उद्योगांमध्ये कच्चा माल घेऊन जाणार ट्रक, बाजारपेठांमध्ये भाजीपाला घेऊन जाणारे वाहन आणि नागपुरात काही कामानिमित्ताने खाजगी वाहनातून आलेले सामान्य नागरिक सर्वच आऊटर रिंग रोडवर अनेक किलोमीटरच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले आहे. काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास आउटर रिंग रोडवरची वाहतूक आंदोलकांनी थांबवली होती, तेव्हापासून कित्येक तास जेवण पाणी शिवाय सामान्य नागरिक आणि ट्रकचालक अडकून पडले आहे.
संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘सातबारा कोरा झाल्याशिवाय आता माघार नाही,’ अशी थेट भूमिका घेत बच्चू कडू यांनी सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. सरकारने या वेळेत मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभरात ‘चक्काजाम’ करण्याचा आणि रेल्वे ट्रॅकवर बसण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मुख्य मागणी.
शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी.
उसाला प्रतिक्विंटल 4300 रुपये एफआरपी (FRP) मिळावा.
कांद्यावरील निर्यात शुल्क कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा – बच्चू कडू
“आमची चर्चेची तयारी आहे. चर्चेचे दार आम्ही बंद केलेले नाही, ते सरकारने बंद केले आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू, त्यानंतर रेल्वे रोखून दाखवू. लोकांची कोंडी होत असली तरी, शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे, त्याचे काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “चर्चेसाठी कृषीमंत्री, महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावे अशी आमची अपेक्षा नाही. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, कर्जमाफी मिळावी ही आमची अपेक्षा आहे,” असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.



