एल के पी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बनच्या वतीने मंगळवेढा येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

एल के पी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बनच्या वतीने मंगळवेढा येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): उद्योग, व्यवसाय, कृषी, सहकार आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय महिला अर्बन तसेच एल के पी मल्टीस्टेटच्या वतीने मंगळवेढा शहरातील दादासाहेब नागणे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये मंगळवेढा शहर आणि परिसरातील लाडक्या बहिणींसाठी मकरसंक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ महिला भगिनींच्या मोठ्या गर्दीमध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
सोलापूर जिल्ह्यातील उद्योग आणि व्यवसायिकांचा आर्थिक कणा समजली जाणारी सूर्योदय महिला अर्बन या संस्थेची मंगळवेढा शाखा तसेच सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये कार्यरत असलेली एल के पी मल्टीस्टेटची मंगळवेढा शाखा यांच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी उद्योजिका, विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिला अधिकारी, गृहिणी, शेतकरी तसेच शेतमजूर महिला अशा विविध स्तरातील भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मंगळवेढा शहरातून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ सुनंदाताई बबनराव अवताडे, उपनगराध्यक्ष प्रा.येताळा नारायण भगत, नवनिर्वाचित नगरसेवक सर्वश्री सोमनाथ महादेव हुशारे, सीमा सोमनाथ बुरजे, विजया अरुण गुंगे, सोमनाथ महादेव माळी, मनीषा नितीन मेटकरी, नागर लहू गोवे, अश्विनी गणेश धोत्रे, सावित्री मच्छिंद्र कोंडूभैरी इत्यादी सत्कारमूर्तींचा समावेश होता. या कार्यक्रमात निवेदक भारत मुढे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या खास शैलीत घेतलेल्या “खेळ पैठणीचा” कार्यक्रमात उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सहभागी महिलांनी निसंकोचपणे प्रत्येक मनोरंजनात्मक खेळामध्ये सहभाग दाखवत या कार्यक्रमाला मनमुरादपणे दाद दिली.
या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी महिलांना आयोजकांच्या वतीने विशेष बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमात मोनाली रंधवे यांनी मानाची पैठणी मिळवली तर पद्मिनी लुगडे यांनी सोन्याची नथ जिंकली. तसेच सारिका नागणे आणि सारिका जाधव यांनी देखील नथ मिळवत खेळाचा आनंद लुटला. या कार्यक्रमात सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी सुरुवातीलाच आपल्या प्रस्ताविकामध्ये सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेट मधील सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा आणि विविध योजना सांगत उपस्थित महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच शेतकऱ्यांसाठी, सरकारी नोकरदारांसाठी असलेल्या कर्ज योजना बद्दल त्याचबरोबर सोनेतारण कर्जाबद्दल सखोल माहिती सांगितली. या दोन्ही संस्थांनी सामान्यजणांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून ग्राहकांच्या अतूट विश्वासावर आणि जनसामान्यांच्या आशीर्वादावर आपली यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही अनिलभाऊ इंगवले यांनी यावेळी सांगितले.
मंगळवेढ्याच्या नूतन नगराध्यक्षा सौ सुनंदाताई अवताडे, उपनगराध्यक्ष प्रा येताळा भगत आणि नगरसेवक सोमनाथ माळी यांनीही यावेळी उपस्थित महिलांसमोर मार्गदर्शन करताना या संस्थांनी फक्त आर्थिक व्यवहारा पुरताच मर्यादित विचार न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून सूर्योदय महिला अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटने जनमाणसाच्या हृदयात आपुलकीचे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. यावेळी मंचावर सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले, सौ लता अवताडे, गणेश धोत्रे, नितीन मेटकरी, सचिन नागणे, वैभव लेंडवे, दत्तात्रय भुसे, योगेश पवार, दत्तात्रय माने व सोमनाथ सावंत, संचालक संतोष इंगवले, मोहन इंगवले तसेच सीईओ अजित दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन देखील सर्व प्रकारच्या उत्तम सुविधेसह अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम संपन्न झाल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या दोन्ही संस्थांतील अधिकारी तसेच कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.



