सामाजिक

आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न 

आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) – आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण १ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात करण्यात आले.

सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात सांगोला तालुक्यातील चार व्यक्ती व एका संस्थेला मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपुलकी सदस्य स्व. संजय काशीद -पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्य व  कुटुंबीयांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत रंगत आणली. नंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.

पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अविरत कष्ट घेवून समाजापुढे आदर्श निर्माण केलेल्या श्रीमती कृष्णाबाई आगतराव खटकाळे यांना “कृतिशील आदर्श माता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. २० एकरात ११ हजार डाळिंब लागवड करुन भरघोस उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झालेले बलवडी येथील शेतकरी तानाजी नामदेव सांगोलकर यांना “सृजनशील शेतकरी पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

व्यसनमुक्तीसाठी बहुमोल कार्य करणारे, त्याचबरोबर गोहत्या बंदी, नदी स्वच्छता अभियानातही योगदान देणारे मेडशिंगी येथील बसवेश्वर गुंडाप्पा झाडबुके यांना “समाजसेवा प्रेरणा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तर लहान वयात एका दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गमवावे लागलेल्या व अशाही परिस्थितीत जिद्दीने मार्गक्रमण करत असलेल्या एखतपूर येथील वैभव विठ्ठल गलांडे यास “सार्थ स्वाभिमान” पुरस्कार प्रदान केला गेला.

गणेशउत्सवाच्या माध्यमातून शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून शाळेसाठी ५ गुंठे जागा उपलब्ध करुन सुसज्ज अशी संगणक सुविधा युक्त इमारत उभी करत शिक्षणाची सोय करणाऱ्या व इतर उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करणाऱ्या सातकी वस्ती, तिप्पेहळी येथील न्यू स्टार गणेश तरुण मंडळास “आदर्श सामाजिक संस्था” पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी आपुलकी परिवारातील सदस्यांचा विविध निवडी व यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उद्योगपती तथा देणगीदार शशिकांत सावंत, नामदेव बजबळकर, उमाजी बजबळकर यांनी आपले मनोगतातून आपुलकीच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भीमाशंकर पैलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.बाळासाहेब वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला आपुलकी सदस्य, कुटुंबीय व देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!