सामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्याचे किर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे आवाहन

मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्याचे किर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे आवाहन

मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम

सांगोला (प्रतिनिधी): समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गाव समृद्ध झाल्याशिवाय जिल्हा व राज्याची प्रगती शक्य नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसहभाग वाढवून, श्रमदानाच्या बळावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करावे, असे आवाहन किर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, पंचायत समिती सांगोला व ग्रामपंचायत अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला (ता. सांगोला) येथील सरदार शामराव लिगाडे विद्यालयाच्या प्रांगणात विशेष जनजागृती किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

शिवलीलाताई पाटील म्हणाल्या की, वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर महाराजांनी तब्बल ७५० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीतून ग्रामीण विकासाचा मूलमंत्र दिला आहे. गाव, नगरे हिरवीगार व समृद्ध झाली पाहिजेत, अन्यथा केवळ संप्रदायाचे सामर्थ्य दाखविणे अयोग्य ठरते. आज ग्रामस्थांनी मनावर घेतले तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नक्कीच यशस्वी होईल. ग्रामस्थांनी श्रमदानासाठी पुढे येऊन स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. गावामध्ये शाश्वत स्वच्छतेचा संस्कार रुजणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाला मिळालेली मोठी संधी असून, या अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, पंचायत समितीच्या माजी उपसभापती शोभाताई खटकाळे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, युवा नेते योगेशदादा खटकाळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सिद्धाराम बोरूटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास चेळेकर, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, कृषी विस्तार अधिकारी बाबासाहेब खटकाळे, सरपंच धनश्री गव्हाणे, उपसरपंच महादेव शिंदे, माजी जि. प. सदस्य अशोक शिंदे, माजी पं. स. सदस्य नंदकुमार शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी डी. आर. लंगोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाव स्वच्छ, समृद्ध व सक्षम करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार आवश्यक – कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, लोकवर्गणी, पाणी व्यवस्थापन व सक्षम पंचायत निर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी व लोकसहभागातून सुशासन आणण्यासाठी सुरू करण्यात आलेले राज्यस्तरीय अभियान आहे. या अभियानांतर्गत ऑनलाइन सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा व चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार अशा विविध घटकांवर विशेष भर देण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!