सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सभासदांसाठी पाच किलो साखर व 10 टक्के डिव्हिडंड जाहीर, संस्थेची तब्बल 500 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सभासदांसाठी पाच किलो साखर व 10 टक्के डिव्हिडंड जाहीर, संस्थेची तब्बल 500 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल
सांगोला (प्रतिनिधी): सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला आणि एलकेपी मल्टीस्टेट या तिन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये सभासद बंधू-भगिनींच्या हजारोंच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. या सर्व संस्थांचे संस्थापक आणि सूर्योदय ग्रुपचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. आमच्या कुशल कर्मचारी वृंदांच्या साथीने सूर्योदय अर्बनने गतवर्षी 115 कोटींचा व्यवसाय केला असून एलकेपी मल्टीस्टेटने 265 कोटींचा व्यवसाय केला आहे. यावर्षी या दोन्ही संस्थांचा मिळून 500 कोटींच्या व्यवसायांचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले असून आमचे ठेवीदार आणि कर्जदार त्याचबरोबर आमच्या सर्व सभासद बंधू-भगिनींच्या सहकार्याने हे उद्दिष्ट आम्ही निश्चित पूर्ण करू अशी अपेक्षाही यावेळी अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केली.

या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरला असून संस्थेच्या वतीने अनेक समाजोपयोगी आणि राष्ट्रहिताचे उपक्रम राबवून संस्थेने सर्व सभासदांसहित समाजातील असंख्य घटकांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केलेले आहे. आपल्या सोबत असलेले या संस्थांचे अतूट नाते कायम अबाधित राहील, असाच या संस्थांचा कारभार आम्ही सतत करत राहू, असेही अनिलभाऊ इंगवले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी मंचावर सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी, सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, एलकेपी मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, सूर्योदय अर्बन महिलाच्या चेअरमन अर्चना इंगवले, लेखापरीक्षक उमा उंटवाले, सह्याद्री परिवाराच्या सुवर्णा इंगवले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुजाता पाटील, चार्टर्ड अकाउंटंट ओम उंटवाले, कायदेशीर सल्लागार ऍड धनंजय लिगाडे त्याचबरोबर तिन्ही संस्थांचे अधिकारी राजकुमार बहिरे, अजित दिघे व रेशमा कमले उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र घेऊन 43 शाखांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे कारभार करणाऱ्या एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी संस्थेला यावर्षी सुमारे 30 लाख रुपयांचा नफा झाल्याचे सांगत सर्व संस्थांच्या सुमारे अडीच हजार रुपयांच्या पुढे शेअर्स असलेल्या सभासदांना भेटवस्तू म्हणून यावर्षी दिवाळीत पाच किलो साखर देणार असल्याचे देखील जाहीर केले. एल के पी मल्टीस्टेटच्या सभासदांसाठी यावर्षी करिता साडेअकरा टक्के इतका डिव्हीडंड जाहीर करण्यात आला. सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे यांनी संस्थेला यावर्षी सुमारे 26 लाख रुपयांचा नफा झाल्याचे सांगत सभासदांसाठी सुमारे 10 टक्के डिव्हिडंड जाहीर केला. त्याचबरोबर दुग्ध व्यवसायाबद्दल सखोल माहिती सांगत सूर्योदय दूध विभागाच्या यशस्वी वाटचालीबाबतची दिशा स्पष्ट केली.
सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर या संस्थेच्या चेअरमन सौ.अर्चना अनिल इंगवले यांनी बोलताना संस्थेने गतवर्षी जिल्ह्याच्या परिसरामध्ये पाच नवीन शाखांची उभारणी आणि 115 कोटींचा व्यवसाय करत सुमारे एक कोटी 20 लाख रुपयांचा नफा मिळवला असून यावर्षी आणखी नवीन सात शाखा उभा करणार असल्याचे सांगत यावर्षी सभासदांसाठी 10 टक्के डिव्हिडंड जाहीर केला. त्याचबरोबर 2500 रुपये शेअर्स पूर्ण करून सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. तीनही संस्थांचे सर्व विषय हजारो सभासदांच्या उपस्थितीत आणि प्रचंड टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

यावेळी जगन्नाथ भगत गुरुजी यांनी आपल्या मनोगतामध्ये सूर्योदयचे सामाजिक उपक्रम आणि विविध व्यवसायाबद्दल माहिती सांगत सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉलमधील ग्राहकांच्या फायद्याच्या विविध योजना सांगितल्या. अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या तरुणांनी घेतलेली औद्योगिक भरारी अचंबित करणारी असून सर्वांना सामावून घेण्याची भावना आणि कारभारातील पारदर्शीपणा तसेच कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची वृत्ती यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्याही पलीकडे हा उद्योग समूह भविष्यात भारतभर आपली गरुडझेप नक्की घेणार अशा भावना यावेळी सह्याद्री परिवाराच्या सुवर्णा इंगवले त्याचबरोबर विविध भागातून आलेल्या रावसाहेब पाटील, दत्तात्रय भाकरे इत्यादी सभासदांनी मंचावरून बोलताना व्यक्त केल्या. या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासदांची विशेषतः महिला भगिनींची मोठी संख्या उपस्थित होती. निवेदक भारत मुढे यांनी आपल्या संगीतमय सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.



