‘किंग’ की ‘किंगमेकर’? दीपकआबांची भूमिका ठरणार निर्णायक”

‘किंग’ की ‘किंगमेकर’? दीपकआबांची भूमिका ठरणार निर्णायक”
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे तापू लागली असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भूमिकेने. शांत, संयमी आणि रणनीतिक शैलीत काम करणाऱ्या दीपकआबांनी नुकत्याच घेतलेल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत युती-आघाडीचा निर्णय घेताना “ज्येष्ठ सहकाऱ्यांशी व्यापक चर्चा करूनच पुढील दिशा ठरवणार” असे स्पष्ट सांगितले. या एका वाक्यामुळे सांगोल्याच्या राजकारणात नवा वेध लागला आहे. त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल असे सांगितले आहे. यामुळे “दीपकआबा साळुंखे पाटील नगरपालिका निवडणुकीत किंग होतील की किंगमेकर?” याकडे जनतेचे लक्ष लागले असून सांगोल्याच्या राजकारणातील पुढील काही दिवस निर्णायक ठरणार हे निश्चित.
नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी जोमात सुरू झाली आहे. सोशल मीडियावर उमेदवारीच्या दाव्यांची स्पर्धा सुरू असून, नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी प्रचाराची डिजिटल चढाओढ रंगवली आहे. या पार्श्वभूमीवर दिपकआबा गटातून माजी नगरसेवक शिवाजीराव बनकर यांच्या इच्छुकतेची नोंद होताच गटात हालचालींना वेग आला आहे.
सांगोला तालुक्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून वर्चस्व असलेल्या दीपकआबा साळुंखे पाटील यांनी गत निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून देत आपली ताकद पुन्हा सिद्ध केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली शहरातील राजकीय रचना आजही प्रभावी मानली जाते. त्यामुळे यावेळी दीपकआबांच्या निर्णयावर इतर पक्षांच्या आखलेल्या रणनीतींचेही भविष्य अवलंबून राहणार आहे. दीपकआबांच्या प्रभावी राजकीय शैलीने अनेकांना कोड्यात टाकले आहे.
शहरातील राजकीय परिस्थिती पाहता दीपकआबा काय भूमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दीपकआबांच्या शांततेतही राजकीय रणनीती लपलेली असते, हे सांगोल्यातील प्रत्येक कार्यकर्त्यास माहीत आहे. त्यामुळे भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांची नजर दीपकआबांच्या पुढील पावलांवर खिळली आहे.
रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे नगरपालिका निवडणुकीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सांगोल्यात आले होते. दरम्यान, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले. सांगोल्यात दीपकआबांची शांत पण निर्णायक शैली, विस्तृत संपर्कजाळे आणि संघटन क्षमता यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय राजकारणात वजनदार मानला जातो. नगरपालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असताना एकच प्रश्न चर्चेत आहे, “दीपकआबा ‘किंग’ ठरणार की ‘किंगमेकर’?”



