उमेदवारीसाठी इच्छुकांचा समाज माध्यमांवर धडाका..!
तिकिटासाठी प्रस्थापितांची धावपळ; जनतेशी संपर्क तोडलेले नेते पुन्हा सक्रिय

उमेदवारीसाठी इच्छुकांचा समाज माध्यमांवर धडाका..!
तिकिटासाठी प्रस्थापितांची धावपळ; जनतेशी संपर्क तोडलेले नेते पुन्हा सक्रिय
सांगोला (प्रतिनिधी): न्यायालयाच्या आदेशाने सुमारे चार वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग आता सुकर झाला असून, दिवाळीनंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एरवी वातानुकूलित गाडीचे सर्व काच बंद करून फिरणाऱ्या नेत्यांना जि. प. व पं. स. निवडणूक टप्प्यात दिसताच सुदामाच्या झोपडीचे उंबरठे झिजविण्याची उपरती झाली आहे. त्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा ही नामी संधी चालून आल्याने आपसुकच त्यांच्या पायाला भिंगरी लागली आहे.
सन 2021 नंतर प्रशासकीय राजवट असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 26 जानेवारी पूर्वी निवडणुका घेणे संदर्भात शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये आता कार्यकर्त्यांमधील वातावरण गरम होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र अनुभवास येत आहे. सांगोला तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटामध्ये सर्वच पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. मात्र, महायुती-महाविकास आघाडी की ‘एकला चलो रे’, याबाबत वरिष्ठांचा आदेश काय? याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. महूद, घेरडी, एखतपूर, कडलास, जवळा, चोपडी, कोळा अशा सात जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या १४ पंचायत समिती गणांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मतदारांना उत्सुकता लागून राहिली आहे.
भाजप, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, आरपीआय व इतर पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराची सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात इच्छुक सहभागी होऊ लागले आहेत. काहींनी व्हॉट्सअँप, फेसबुक, तसेच इतर समाज माध्यमांमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याचबरोबर आपल्या मतदारसंघातील गावागावांत दिवाळीनिमित्त शुभेच्छा बॅनर झळकविले आहेत.
राज्याच्या राजकारणातील युती-आघाडी धर्म पाळायचा की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा, याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे इच्छुक उमेदवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राज्याच्या राजकारणातील युती-आघाडी धर्म पाळायचा झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा येईल व परिणामी बंडखोरी अथवा उमेदवारांची इन्कमिंग- आउटगोइंग पाहायला मिळेल. यामुळे सर्वच पक्षांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. सांगोल्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरक्षण जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांनी समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालून चांगलीच धमाल उडवून दिली आहे.
नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी विविध गटांतून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समाज माध्यमांद्वारे जाहीर करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. पोस्टर, समाज माध्यम पोस्ट आणि डिजिटल प्रचारातून संभाव्य उमेदवार आपली उपस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छुकांनी आपली दावेदारी समाज माध्यमांवर जाहीर केली आहे. ‘मी तयार’, ‘तुमचा सेवक’, ‘गावाच्या विकासासाठी’ अशा आशयाच्या पोस्ट, संदेश आणि बॅनरच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांनी प्रचारयुद्धाची डिजिटल सुरुवात केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतीतून पुढे आलेले सदस्य, माजी पदाधिकारी; तसेच काही नवोदित चेहरेही दिसत आहेत. अनेकांनी समाज माध्यम प्लॅटफॉर्मवर प्रचार मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी स्थानिक पातळीवर जनसंपर्काच्या गाठीभेटीही सुरू केल्या आहेत.
दरम्यान, निवडणुकीची अधिकृत अधिसूचना अद्याप लागलेली नसतानाही इच्छुकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर नेमकी कोणाला प्रत्यक्ष उमेदवारी मिळणार, कोणावर पक्षांचा विश्वास बसतो, कोणाला तिकीट मिळते आणि कोणाची काटछाट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षीय राजकारणातील समीकरणे, गटबाजी आणि मतदारसंघातील स्थानिक राजकीय प्रभावामुळे आगामी काही दिवसांत स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. पंचायत समितीच्या अनेक गटांतही इच्छुकांची समाज माध्यमांवरील मोहीम जोमात सुरू आहे. डिजिटल प्रचाराला उमेदवारांनी स्पष्ट पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. पारंपरिक प्रचाराला आधुनिक डिजिटल माध्यमांची जोड मिळाल्याने स्थानिक राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहे.
मागील चार वर्षात निवडणुका झाल्या नसल्याने सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. मात्र आता सर्व संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या बरोबरच काम करण्याबाबत दिलेल्या सूचना लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पक्ष नेतृत्वाला पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा एकदा उभी करण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे. निवडणुकांसंदर्भातील केवळ आरक्षण जाहीर झाल्यानंतरच प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये सुरुवात झालेली निवडणूक लढवण्याची स्पर्धा लक्षात घेता गेल्या पंधरा दिवसात या प्रमुख राजकीय पक्षांच्या प्राथमिक बैठका प्रत्येक विभागातून संपन्न झाल्याची माहिती हाती आली आहे.
सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढविण्याबाबत प्राथमिक स्तरावरूनच सुरू केलेली तयारी लक्षात घेता आगामी निवडणुका या सांगोला तालुक्यात बहुरंगी होतील की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याकडूनच सुरुवात झालेली संपर्काची मोहीम व सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या असलेल्या मतदारसंघातील नोंदी बाबत सुरू झालेली पाहणी लक्षात घेता आगामी निवडणुकांसाठी सांगोला मतदार संघात वातावरणातील तापमानाबरोबरच राजकीय वातावरण गरम होऊ लागल्याचे स्पष्ट चित्र अनुभवास येत आहे. यामुळेच आगामी दोन ते तीन महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांकरता या आघाडी व युतीमधील निवडणुका कशा पद्धतीने संपन्न होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


