
सांगोल्यात स्व. आबासाहेबांच्या घरावर भ्याड हल्ला
घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात कडकडीत बंद,
सांगोला (प्रतिनिधी): माजी आमदार स्व, गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरातील घरावर शुक्रवार १० ऑक्टोबर दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकत भ्याड हल्ला केला. या निंदनीय घटनेनं सांगोल्यासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेबद्दल सर्वस्तरामधून संताप व्यक्त केला जात असून निषेधदेखील नोंदवण्यात येत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर, सर्व पक्षीयांच्यावतीने शनिवार ११ ऑक्टोबर रोजी सांगोला बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या अज्ञातास शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना देण्यात आलं आहे.
सांगोला शहरातील महात्मा फुले चौक येथून पक्षप्रवेशसाठी निघालेल्या रॅलीतील अज्ञात कोणीतरी स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या बंगल्याच्या दारासमोर दारूची बाटली फेकली. या घटनेची माहिती मिळताच, सांगोला शहर आणि तालुक्यातील शेकापच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंगल्यासमोर धाव घेतली. वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी तातडीने बंगल्यासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला.
सांगोला शहरात (स्व.) गणपराव देशमुख वांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, वा मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे व सांगोला पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट काशीद यांना निवेदन देण्यात आले आहे. वा हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दीनदलित, गोरगरीब, सर्वसामान्य यांचा आवाज बनून स्व. आबांनी सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्हा पर्यायाने महाराष्ट्राची ६०-६५ वर्षे सेवा केली, त्यांचं असं प्रायश्चित्त मिळणं हे क्लेशदायक आहे. घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. ज्याने कोणी हा प्रकार केला, त्याचा कसलाच पुरावा नाही. त्यामुळे कोणाचे नाव घेऊन वातावरण कलुषित करु नये. निषेधात्मक पाळण्यात येणारा आजचा सांगोला बंद शांततेत पार पाडावा, असे सर्वांना आवाहन आहे. हल्लेखोर सापडला तरी त्यास कारवाई न करता परिवारातील सदस्य म्हणून समज देत पोलीस प्रशासनाने सोडून द्यावे,
– डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार, सांगोला