गरब्याच्या आयोजनांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी महिलांना सुरक्षित व्यासपीठ – अमृता फडणवीस

गरब्याच्या आयोजनांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी महिलांना सुरक्षित व्यासपीठ – अमृता फडणवीस
सांगोला (प्रतिनिधी): गरब्याचे आयोजन केल्याने महिलांना नृत्य आणि पारंपरिक कला सादर करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे कलागुण प्रदर्शित होतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळते. या आयोजनांमुळे महिलांना एकत्र येण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी एक सुरक्षित आणि आनंदी व्यासपीठ मिळते. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते आणि समाजात त्यांच्या कलागुणांना अधिक महत्त्व प्राप्त होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर अमृता फडणवीस यांना गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही. गरब्याच्या विविध गाण्यांवर त्यांनी काही तरुणी, महिलांसह गरबा खेळण्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला. यावेळी सहभागी झालेल्या तरुणी, महिलांसह अमृता फडणवीस याही गरबा खेळण्यात सहभागी झाल्याने सर्वांनाच आनंद झाला.
छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर, सांगोला व जोतिर्लिंग प्रतिष्ठान संचलित, जोतिर्लिंग प्रतिष्ठान आयोजित दांडिया गरबा नाईट-२०२५ या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सुजाता चेतनसिंह केदार सावंत, पुण्याचे माजी नगरसेवक सम्राट थोरात, सिंगर संजू राठोड, बिग बॉस फेम जानवी किल्लेकर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.
पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, सांगोल्याच्या कर्तबगार महिला आणि पुरुषांनी डाळींबाच्या उत्पादनात सांगोल्याचे नाव देश आणि जागतिक पातळीवरती पोहचवून देशाला परकीय चलन मिळवून देण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, सांगोल्याच्या भूमीत गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चालवलेला भव्य दांडिया स्पर्धा हा फक्त मनोरंजनापुरता कार्यक्रम नाही. हा उपक्रम म्हणजे एक संस्कृतीचा उत्सव आहे, एक महिला सक्षमीकरणाचा संकल्प आहे. समाजात महिला ही घरासाठी, कुटुंबासाठी, नातीगोतींसाठी स्वतःला पूर्णपणे अर्पण करते. पण तिच्या कलेला, कौशल्याला, मेहनतीला कौतुकाची दाद मिळत नाही, सन्मान मिळत नाही. आज इथल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक बहिणीला, हक्काचं व्यासपीठ मिळावं, तिच्या कलागुणांना वाव मिळावा, तिचं कौतुक व्हावं हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं सौंदर्य अधिकच उजळून निघालं आहे. त्यांच्या कार्यातून महिलांना प्रेरणा मिळते, त्यांच्या उपस्थितीने आजच्या या व्यासपीठाचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे. सांगोला हा फक्त दांडियाचा उत्सव साजरा करणारं शहर राहणार नाही, तर महिला सक्षमीकरणाचं केंद्रबिंदू बनणार आहे असे त्यांनी सांगितले.
या महोत्सवाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पारंपरिक गुजराथी, राजस्थानी वेषभूषा करून दांडिया खेळण्यास आल्या होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अफजल शेख, किरण चव्हाण, इन्नुस नदाफ, विनोद काटकर, सौरभ देशपांडे, चिवळ्या कोळी, अविनाश गायकवाड, नागेश लोखंडे, राजू शिंदे, अनिल शिंदे, पिंटू शिंदे, सुरेश जगधने, शुभम डांगे, शाम माळी यांच्यासह
छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर, सांगोला व जोतिर्लिंग प्रतिष्ठान संचलित, जोतिर्लिंग प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. राज्यावरील संकट लवकरात लवकर दूर होऊ दे असे देवीला साकडं घातलं आहे. – अमृता फडणवीस