पूराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी सांगोल्याकडे वळवा’
टेंभू, म्हैसाळ योजना व नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

पूराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी सांगोल्याकडे वळवा’
टेंभू, म्हैसाळ योजना व नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असताना दुष्काळी सांगोला तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा व नीरा नदीपात्रातून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याकडे वळवावे, अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यंदाच्या पावसाळ्याला दीड महिना उलटूनही सांगोला तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून विहिरी, कूपनलिका, तलाव आणि अन्य जलस्रोत तळाला गेल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाईही तीव्र झाली आहे. ऐन पावसाळ्यात काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.दुसरीकडे कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा व नीरा नदीखोऱ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणी समुद्राकडे वाहून जात आहे. हेच अतिरिक्त पाणी टेंभू योजनेद्वारे माणगंगा नदीत, म्हैसाळ योजनेद्वारे कोरडा नदीत तसेच नीरा उजवा कालव्यातून सांगोला शाखा कालव्यात सोडून तालुक्यातील लहान-मोठे तलाव भरल्यास दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त या दोन्ही भागांचा समतोल साधत तातडीने निर्णय घेऊन सांगोला तालुक्याला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी साळुंखे-पाटील यांनी केली आह’पूरग्रस्तांबरोबर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा’
कृष्णा, कोयना, नीरा आणि पंचगंगा नदी परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर सांगोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू, म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून सांगोल्याकडे वळविल्यास पूरग्रस्त तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिली.



