चुलीतील विस्तवाचा भीषण कहर; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
घेरडीतील घटना; जर्सी गाईचा होरपळून मृत्यू; कोळेकर कुटुंब उघड्यावर; एक गाय गंभीर जखमी

चुलीतील विस्तवाचा भीषण कहर; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
घेरडीतील घटना; जर्सी गाईचा होरपळून मृत्यू; कोळेकर कुटुंब उघड्यावर; एक गाय गंभीर जखमी
सांगोला (प्रतिनिधी): घेरडी (ता. सांगोला) येथील दिवाण मळा परिसरात गुरुवारी दुपारी चुलीतील विस्तवाने पेट घेतल्याने भीषण आग लागून एका शेतकरी कुटुंबाचा संसार अक्षरशः राख झाला. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण करत पत्र्याचे घर, घरातील संसारोपयोगी साहित्य आणि जनावरांना आपल्या विळख्यात घेतले. या दुर्घटनेत एका जर्सी गाईचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गाय गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या आगीत अंदाजे ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कोळेकर कुटुंबाचे सर्वस्व आगीत भस्मसात झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, घेरडी गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील गट क्रमांक १०८७/१ मधील शेतात अंकुश कोळेकर यांचे पत्र्याचे राहते घर आहे. घरासमोर स्वयंपाकासाठी काडाचे छप्पर उभारण्यात आले होते. गुरुवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास त्यांच्या पत्नीने चुलीवर स्वयंपाक करून जेवण आटोपले. त्यानंतर अंकुश कोळेकर घरात विश्रांती घेत होते, तर पत्नी बाहेर कामासाठी गेली होती. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे चुलीतील विस्तव उडून काडाच्या छपराला आग लागली. काडाचे छप्पर असल्याने काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ज्वाळांनी पत्र्याच्या घरालाही वेढा घातला. अचानक धुराचे लोट आणि ज्वाळा पाहताच अंकुश कोळेकर यांनी घराबाहेर धाव घेत आरडाओरड केली. त्यांच्या हाका ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले.
ग्रामस्थांनी पाणी, माती आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग वेगाने पसरत गेली. अग्नितांडव थांबेपर्यंत घरातील धान्य, कपडे, फर्निचर, भांडी, घरगुती साहित्य, विद्युत उपकरणे आणि अन्य संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. घराशेजारी बांधलेल्या दोन जर्सी गाईंनाही आगीचा फटका बसला. त्यापैकी एका गाईचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गाय गंभीररीत्या भाजल्याने तिच्यावर पशुवैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कोळेकर कुटुंबाला मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रेखा आवताडे यांनी तत्काळ तहसील प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर गावकामगार तलाठी विनोद भंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन जळीत घर, मृत जनावर आणि नुकसानीचा पंचनामा केला. प्राथमिक पाहणीनुसार या आगीत ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कोळेकर कुटुंबाला धीर देत तातडीच्या मदतीचा हात पुढे केला. दरम्यान, या संकटग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत, घर पुनर्बांधणीसाठी सहाय्य आणि मृत जनावराची नुकसानभरपाई निधी त्वरित मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



