उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेची ड्युटी; १६ मेपासून प्रशिक्षण व घरगणना सुरू

उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेची ड्युटी; १६ मेपासून प्रशिक्षण व घरगणना सुरू
सांगोला (प्रतिनिधी): राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे २ मे पासून १४ जूनपर्यंत उन्हाळ्या सुट्टया असणार आहेत. परंतु, यावर्षी जनगणनेच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने शिक्षकांना यंदा उन्हाळा सुट्ट्या मिळणार नाहीत. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन १६ मे पासून त्यांना गावागावातील घरांची गणना करुन त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शाळांना उन्हाळा सुट्टी लागली तरीदेखील शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आल्या आहेत. सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत
राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे २ मे ते १४ जून दरम्यान उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी यंदा शिक्षकांना सुट्टीचा लाभ मिळणार नाही. आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर शासनाने शिक्षकांना घरगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उन्हाळी सुट्टीतही मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार असून १६ मेपासून गावागावातील घरांची गणना, घरयादी तयार करणे व माहिती संकलनाचे काम सुरू होणार आहे. हा आदेश सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षकांना लागू राहणार आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांना मात्र कामकाजासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
जनगणना २०२७ दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना केली जाणार आहे. प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार असून शासनाने निश्चित केलेले ३४ प्रश्न घरातील प्रमुख व्यक्तीकडून विचारले जाणार आहेत. ही माहिती ‘एचएलओ’ अॅपच्या माध्यमातून थेट जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना २७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर १६ मेपासून घरगणना सुरू होऊन १४ जूनपर्यंत हे काम चालणार आहे. या कालावधीत कोणत्याही शिक्षकाने मुख्यालय, गाव किंवा शहर सोडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी केली जाणार असून १ मार्चपासून जातिनिहाय जनगणना सुरू होणार आहे. या मोठ्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने मनुष्यबळाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात ‘टीईटी’ परीक्षा होण्याची शक्यता असल्याने शिक्षकांना जनगणनेच्या कामासोबतच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा शिक्षकांसाठी अधिक धावपळीचा ठरणार आहे.
चालू शैक्षणिक सत्र ३० एप्रिल रोजी संपणार असून २ मेपासून सुट्टी लागणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू होणार असले तरी या काळात शिक्षकांना सुट्टीऐवजी जनगणनेचे काम करावे लागणार आहे. जनगणनेचे काम पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना नंतर विशेष रजा देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



