जनतेच्या सेवेतून घडलेले यश! गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कार
शिराळा पंचायत समितीतील उत्कृष्ट कामगिरीची राज्यस्तरावर दखल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

जनतेच्या सेवेतून घडलेले यश! गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कार
शिराळा पंचायत समितीतील उत्कृष्ट कामगिरीची राज्यस्तरावर दखल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान
पुणे (प्रतिनिधी): शिराळा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचा ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात ७ मार्च २०२६ रोजी झालेल्या समारंभात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे तसेच जिल्हा परिषद, पुणे येथील अनेक अधिकारी उपस्थित होते.
संतोष राऊत यांनी शिराळा पंचायत समितीत ऑगस्ट २०२१ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत गटविकास अधिकारी म्हणून कार्य करताना अनेक विकासकामे यशस्वीपणे राबविली. त्यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वा वित्त आयोग, जनसुविधा योजना, नागरी सुविधा योजना तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
घरकुल योजनेत उत्कृष्ट कामगिरी करत शिराळा पंचायत समितीला अनेक पुरस्कार मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच यशवंत पंचायतराज अभियानात सलग तीन वर्षे शिराळा पंचायत समितीला पुणे विभागात अग्रेसर ठेवण्यात त्यांना यश मिळाले. या अभियानात पंचायत समितीने राज्यात तृतीय क्रमांकही पटकावला होता. त्यांच्या पुढाकाराने पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले, तसेच अभिलेख वर्गीकरणातही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली गेली. पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण व लॉन तयार करून परिसर आकर्षक करण्यातही त्यांनी मोलाचा हातभार लावला.
यापूर्वी पंचायत समिती सांगोला (जि. सोलापूर) येथे मे २०१८ ते ऑगस्ट २०२१ या काळात कार्यरत असताना त्यांनी कोविड काळात आरोग्य विभागाचे प्रभावी नियोजन करून परिस्थितीवर मात करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या ‘ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट’ या कार्यपद्धतीची त्या काळात राज्यभर चर्चा झाली होती. तसेच २०१९ च्या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे उत्कृष्ट नियोजन करून सांगोला तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यात त्यांनी यश मिळवले. आवास योजना व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सांगोला पंचायत समितीच्या विकासाला त्यांनी वेग दिला.
तसेच सप्टेंबर २०१५ ते मे २०१८ या कालावधीत पंचायत समिती उदगीर (जि. लातूर) येथे कार्यरत असताना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उदगीर तालुका ओडीएफ करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०१६ च्या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा दिला.
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संतोष राऊत यांनी गेल्या दशकभरातील आपल्या कामकाजातून जनतेप्रती असलेली संवेदनशीलता आणि प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट २०२४ मध्येच त्यांना ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कार जाहीर केला होता. सध्या पदोन्नतीनंतर संतोष राऊत हे सहाय्यक आयुक्त (चौकशी) या पदावर विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे कार्यरत आहेत. त्यांनी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली होऊन यावे, अशी अपेक्षा अधिकारी व कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक कामकाज करणारा अधिकारी अशी ओळख संतोष राऊत यांनी निर्माण केली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



