राज्य कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू; शेतकऱ्यांना घरबसल्या अर्जाची सुविधा
पारदर्शक, सुलभ आणि जलद प्रक्रियेसाठी कृषी विभागाची डिजिटल पायरी

राज्य कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू; शेतकऱ्यांना घरबसल्या अर्जाची सुविधा
पारदर्शक, सुलभ आणि जलद प्रक्रियेसाठी कृषी विभागाची डिजिटल पायरी
सांगोला (प्रतिनिधी): कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी राबविल्या जाणाऱ्या अर्ज प्रक्रियेमधील अर्ज स्वीकारणे, छाननी करणे यांसारखी ऑफलाइन कामे बंद करण्यात आली आहे. ही कामे आता संगणकीय प्रणालीद्वारे होतील. कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी राबविल्या जाणाऱ्या अर्ज प्रक्रियेमधील अर्ज स्वीकारणे, छाननी करणे यांसारखी ऑफलाइन कामे बंद करण्यात आली आहे. ही कामे आता संगणकीय प्रणालीद्वारे होतील. तसेच पारदर्शकतेसाठी अर्जदार शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावरील माहिती दिली जाणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांसाठी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीऐवजी आता ऑनलाइनद्वारे अर्ज करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली आहे. सदर कृषी पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २० मार्च पर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करून पुरस्काराचे मानकरी होण्यासाठीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी केले आहे.
देशात महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. राज्यात यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपरिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधीत लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाइन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, सेंद्रिय शेतीमधील कृषिभूषण, युवा शेतकरी पुरस्कार असे मानाचे पुरस्कार शेतकऱ्यांना दरवर्षी दिले जातात. तसेच, कृषी विभागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दिला जातो.
राज्यपालांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांसाठी राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने दाखल करीत होते. धक्कादायक बाब म्हणजे, प्रस्ताव तयार करणे, दाखल करणे, त्यासाठी प्रवास यातच शेतकऱ्याला हजारो रुपयांचा खर्च करावा लागत होता. पुरस्कारांच्या अर्जाची छाननी ते निवडीसाठी विविध स्तरांवर समित्या होत्या. मात्र अनेकदा राजकीय निरोप तसेच पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांद्वारे निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात होता. काही वेळा शेतकऱ्याला त्याचा अर्ज नेमका कोणत्या टप्प्यात आहे व तो कशामुळे नाकारला हेदेखील कळत नव्हते. पुरस्कार प्रस्ताव दाखल करण्यासाठी वापरली जात असलेली पारंपरिक ऑफलाइन पद्धत किचकट होती.
प्रस्तावाचे सादरीकरण, पडताळणी व संकलनाची कामे शेतकरी आणि अधिकाऱ्यांसाठीदेखील डोकेदुखी बनली होती. त्यातून चांगले प्रस्ताव नाकारले जात असत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला होता. परिणामी, कृषी विभागाच्या वतीने ऑफलाइन प्रक्रिया कायमची बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कृषी विभागाच्या संकेतस्थळावरच आता पुरस्कारांचे प्रस्ताव दाखल करता येतील. शेतकऱ्यांनी एकदा कागदपत्रे अपलोड केल्यास ती पुन्हा मागितली जाणार नाहीत. अर्जाचा टप्पा शेतकऱ्यांना सांगितला जाईल. प्रस्तावाची छपाई, झेरॉक्स, त्यासाठी प्रवास व पोस्ट खर्च यातून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दाखल होणाऱ्या प्रस्तावांचे सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मितीची प्रक्रिया आता ऑनलाइन होईल. कोणत्याही टप्प्यावर मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
ही प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध आहे. या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवालनिर्मिती ही संपूर्ण डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार आहे. या पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. सदर कृषी पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २० मार्च पर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करून पुरस्काराचे मानकरी होण्यासाठीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. दिपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला




AT P SHIGAON Lakshmi Nagar TAL WALWA DIST SANGIL PIN 416302