राजकीय

सांगोल्यात ‘युती की आघाडी‌’वर संभ्रम

नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा ठरलाय; तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी गत

सांगोल्यात ‘युती की आघाडी‌’वर संभ्रम

नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा ठरलाय; तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी गत

सांगोला (प्रतिनिधी): नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून तीन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने सांगोल्यात ‘युती की आघाडी‌’वर संभ्रम निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा ठरलाय; तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी गत सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अजूनही संभ्रमावस्था असून नेत्यांनी इच्छुकांना अद्यापही अधांतरीच ठेवले आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असून अंतिम उमेदवार निवडीवरून गोंधळ तसेच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सांगोला नगरपालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती, काही पक्षांकडून बैठका, तर काही पक्षांच्या निरीक्षकांचे दौरे सुरू झाले आहेत. मात्र निवडणुका आघाडी की युतीच्या माध्यमातून लढायच्या, या विषयावर प्रमुख पक्षांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून केवळ नगराध्यक्षपद हा युती व आघाडीमध्ये कळीचा मुद्दा ठरला आहे. तीन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने सांगोल्यात ‘युती की आघाडी‌’वर संभ्रम निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा ठरलाय; तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी गत सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.

काही इच्छुकांनी थेट विरोधकांना पाठिंबा मागण्यासाठी उंबरठे झिजवले आहेत. ज्या पक्षाचे काम करीत आहोत त्या पक्षाकडे उमेदवारी न मागता विरोधकांच्या वळचणीला जावून उमेदवारीची मागणी करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी…काय पण. ? अशी चर्चा सांगोला शहरात रंगली आहे.

10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत भाजप, शिंदे सेना, अजित पवार राष्ट्रवादी यांची युती होणार की स्वबळावर लढणार हा कळीचा मुद्दा शिल्लक राहिला आहे. तोच पेचप्रसंग महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाला आहे. शेकाप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना व काँग्रेस या आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांकडून बैठका, वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, इच्छुकांच्या मुलाखती, तर निरीक्षकांचे दौरे सुरू झाले आहेत. सर्वच राजकीय पक्ष नगराध्यक्ष पदावर अडून बसला असल्याने ‌‘वेट ॲण्ड वॉच‌’च्या भूमिकेत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नसली तरी नगराध्यक्षपद व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

एकूणच उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला सर्व प्रमुख पक्षांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणाची युती होते, कोणाची आघाडी होणार यावर संभ्रम असला तरी नगराध्यक्ष पदावर दावा कोण करतो यावर ही युती स्पष्ट होईल; अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीचा नवा राजकीय डाव खेळला जाईल. एकूणच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्वच पक्षांकडून पूर्वतयारी करण्यात आल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार असा संभ्रम त्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवार निवडताना दमछाक होताना दिसत आहे. शिवाय उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांची नाराजीही ओढावून घेण्याची वेळ नेते मंडळींवर आलेली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या जोरबैठकाही वाढलेल्या आहेत. बदलती राजकीय परिस्थिती, नगराध्यक्ष पदासाठी पडलेले आरक्षण, त्यासाठी योग्य क्षमतेचा उमेदवार, तो उमेदवार किती खर्च करू शकेल, पक्षावरील निष्ठा यांचा सारासार विचार नेतेमंडळी करताना दिसत आहेत. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने त्यासाठी योग्य उमेदवार शोधतानाही नेते मंडळींचा कस लागत आहे. याशिवाय नगरसेवकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने त्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न नेत्यांना पडला आहे. तब्बत पाच वर्षानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने गेली पाच वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची की पक्षात उमेदवारीसाठी आलेल्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची यावरूनही राजकीय पक्षांमध्ये जोरदार घमासाम सुरू झाल्याचे जाणवते. महायुती एकसंध राहील की शेवटच्या क्षणी फुटेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या हक्काच्या जागा न सोडता आपल्या वाट्याला जास्तीत जास्त जागा मिळवून घेण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे. त्यामुळे युती आणि आघाडीतील घटक पक्ष यांच्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रस्सीखेच दिसून येणार आहे. पुढील काळात युती आणि आघाडीतील जागा समाधानकारक होते की घटक पक्ष स्वबळावर मैदानात उतरतात. हेही महत्त्वाचे ठरणार आहे. अद्याप तरी प्रत्येक पक्ष समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आहेत. पक्ष कार्यालये गजबजली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांची कार्यालये आता नेते आणि कार्यकर्त्यांच्या वर्दळीने गजबजून गेल्याचे जाणवत आहे. गाड्यांचा ताफा कार्यालयाबाहेर उभा असताना दिसू लागल्याने परिसराला जाग आल्याचे दिसत आहे. इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांना समर्थकांसह येताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात नेतेही खूष झाल्याचे जाणवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!