ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार आरोग्यसेवेसाठी स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ

ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार आरोग्यसेवेसाठी स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ
सांगोला (प्रतिनिधी): दर्जेदार आरोग्यसेवेसाठी स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानाचा महिलांनी लाभ घ्यावा. सांगोला तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर हे 24 तास काम करत असतात. सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये नैसर्गिक प्रसूती सिजर त्याचबरोबर साप चावणे, विषबाधा, लहान मुलांचे लसीकरण, नेत्ररोग तपासणी व इतर अनेक सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. ग्रामीण रुग्णालयात असे शिबिर आयोजित करणे म्हणजे आरोग्य यंत्रणा बळकट करणे होय. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे सांगोला तालुक्यावर विशेष प्रेम आहे. आरोग्य सुविधा यांचा जास्तीत जास्त तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सांगोला तालुक्यातील महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे डॉ. भगवान पवार (उपसंचालक आरोग्य सेवा पुणे), डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ.एस.पी. कुलकर्णी (बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधीक्षक सोलापूर) व डॉ.अरविंद गिराम (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 21 सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, घरातील महिला सुदृढ असेल तर संपूर्ण घर सुदृढ राहते. त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागृती असणे हे त्या घराचे पर्यायाने तालुक्याचे व राष्ट्राचे सुदृढ असल्याचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर ट्रॉमा केअर युनिट हे लवकरात लवकर चालू करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत असे वक्तव्य त्यांनी केले.
यावेळी निरोगी जीवनशैली आणि पोषण या विषयीची माहिती घेताना दिग्विजय पाटील यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि आजच्या जीवनात किती पैसे आहेत हे महत्त्वाचे नसून आपले आरोग्य कितपत सुदृढ आहे हे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप देवकते, दत्तात्रय सावंत, खंडू सातपुते, सतीश सावंत, दीपक गोडसे, डॉ. रणजीत केळकर, डॉ. विजय बंडगर, विनोद उबाळे, विनोद बाबर, अमित पाटील, सुरेश काळे, बापूसाहेब ठोकळे, मिलिंद बनसोडे उपस्थित होते. या शिबिरामध्ये महिलांचे आरोग्य तपासणी रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी, स्तन व गर्भाशयाचे कॅन्सर, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, हिमोग्लोबिन, क्षयरोग तपासणी त्याचबरोबर नारी सशक्त करण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि पोषण आहार याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. माता व बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृबंधन योजना, आयुष्यमान वयोवंदन कार्ड इत्यादी सेवांचा शुभारंभ आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम फुले, डॉ. पूजा साळे, डॉ.शंभूराजे साळुंखे, डॉ.वंदना चाकणे, डॉ.अनमोल गवारे, डॉ. असिफ सय्यद, डॉ.वैभव जांगळे व सर्व मेडिकल, पॅरामेडिकल, नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.



