रेल्वेच्या बोगद्यात पाण्याचे झरे, अधिकारी पाहतील तेंव्हा खरे..!
सांगोल्यातील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह..?

रेल्वेच्या बोगद्यात पाण्याचे झरे, अधिकारी पाहतील तेंव्हा खरे..!
सांगोल्यातील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह..?
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील मिरज रोडवरील रेल्वे भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षानंतरही निकृष्ट कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यात ठेकेदाराला दोनवेळा अपयश आले. पुन्हा एकदा भुयारी मार्गातील वॉटर ट्रिटमेंट आणि भिंतींच्या कामाच्या नावाखाली १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत भुयारी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या बोगद्यात पाण्याचे झरे, अधिकारी पाहतील तेंव्हा खरे..अशी अवस्था रेल्वेच्या भुयारी मार्गाची झाली असून सांगोल्यातील मिरज रोडवरील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह..? निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारा रेल्वे भुयारी मार्ग बंद ठेवू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांसह व्यापाऱ्यांनी दिला आहे.

ठेकेदाराला रेल्वेच्या सांगोला मिरज रोडवरील भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करता आला नाही. दरम्यान बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर रेल्वेच्या भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा होत नसल्याने कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान, वाहनधारकांना पाण्यातील वाट काढत प्रवास करावा लागत असून रेल्वेच्या भुयारी मार्गात ठिकठिकाणी पाण्याचे झरे वाहू लागले असल्याने बोगद्यात पाणीच पाणी साचले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाकडे संबधित रेल्वेचे अधिकारी, ठेकेदार पाहतील तेंव्हा खरे… असा सुर जनतेतून उमटत आहे.
सांगोला शहरातील रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम सुरू असल्यापासून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार या भुयारी मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत जनतेतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. थोडा पाऊस झाला तरीही या पावसाने भुयारी मार्गाच्या सर्वच बाजूच्या संरक्षण भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे वाहत असल्याने रेल्वेच्या भुयारी मार्गात झरे निर्माण झाले की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
कायमच रेल्वेच्या भुयारी मार्गात १ फूट पाणी साचत असल्याने तसेच मध्यभागी गाळ साचल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. अरुंद दुहेरी मार्गामुळे शालेय विद्यार्थी, नागरिकांना या मार्गातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अल्प पावसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचत असेल तर मोठया पावसाने या भुयारी मार्गाची काय अवस्था होईल अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. पाणी साचून राहत असल्याने अनेकवेळा लहान मोठे अपघात झाले आहेत. हा भुयारी मार्ग सांगोला शहरातील सतत वर्दळीचा मार्ग आहे.
भुयारी मार्गाची खोली २० फूट असल्याने सखल भागातील गटारीचे पाणी भिंतीतून पाझरत आहे. असे असतानाही ठेकेदाराकडून निकृष्टपणे काम झाले आहे. या मार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान रेल्वेचे संबधित अधिकारी, ठेकेदाराने या भुयारी मार्गाच्या कामाची साधी पाहणी देखील केली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी दोन महिने बंद राहणार असून पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आणखी किती काळ नागरिक, वाहनधारकांना रेल्वेच्या भुयारी मार्गात पाण्यातून प्रवास करावा लागणार ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे.

सांगोला शहरातील सांगोला मिरज रोडवरील रेल्वे गेट क्रमांक ३२ बोगद्याच्या ठिकाणी दुरुस्तीसाठी एक नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत दोन महिने वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असला तरी आम्ही येथील वाहतूक दोन महिने बंद होऊ देणार नाही. वाहनधारक व प्रवाशांना पर्यायी चांगला रस्ता नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे बोगदातून होणारी वाहतूक दोन महिने बंद ठेवू देणार नाही अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार यांनी घेतली आहे.



