सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ६० कोटींच्या पिकांचे नुकसान
५९ हजार ११० शेतकरी बाधित, ५६ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ६० कोटींच्या पिकांचे नुकसान
५९ हजार ११० शेतकरी बाधित, ५६ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
सांगोला (प्रतिनिधी): ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ५९ कोटी ७९ लाख १६ हजार १२५ रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ५९ हजार ११० शेतकरी बाधित झाले असून ५६ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. सर्वाधिक फटका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला बसला आहे, त्यासाठी नुकसानभरपाई मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली.
नदीकाठी पूरस्थिती निर्माण होऊन केळी, उडीद, सोयाबीन, तूर यासह अन्य शेतपिकांचे नुकसान झाले होते. तसेच उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. बार्शी तालुक्यातील ९५.१० हेक्टर क्षेत्रावरील ३०९ शेतकरी बाधित झाले असून ८ लाख १८ हजार पाचशे पन्नास रुपये, तर अप्पर मंद्रूप तहसील अंतर्गत १४८.१२ हेक्टर क्षेत्र आणि २८४ शेतकरी बाधित झाले असून १३ लाख ९९ हजार ४२० रुपये, माढा तालुक्यातील ९११.४० हेक्टर क्षेत्रावरील १३११ शेतकरी बाधित झाले असून, १ कोटी ५९ लाख ६१ हजार ३०० रुपयांची नुकसान झाले आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील २७८५.५४ हेक्टर क्षेत्रावरील ६ हजार १०१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, ४ कोटी ७० लाख ५० हजार १८० रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत. मोहोळ तालुक्यातील १०२.८३ हेक्टर क्षेत्रावरील १३० शेतकरी बाधित झाले असून, १७ लाख ७३ हजार ६८५ रुपये इतक्या रुपयांची मदतीची आवश्यकता आहे.
उत्तर सोलापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यातील संपूर्ण गावात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तरमध्ये २१ हजार ८५६ शेतकरी बाधित झाले असून २५ हजार ०३६ हेक्टर क्षेत्र बाधित क्षेत्रांसाठी २६ कोटी ३ लाख १८ हजार ३० रुपये, तर अक्कलकोट तालुक्यातील १३ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांच्या १५ हजार ३५२ बाधित क्षेत्रासाठी १४ कोटी ४ लाख १३ हजार ८५ रुपये तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ हजार ७०३ शेतकऱ्यांचे ११ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावरील पिके ही बाधित झाली आहेत. ११ कोटी ९९ लाख दहा हजार दोनशे रुपये नुकसान झाले आहे. तसा नुकसानाची प्रस्ताव शासनाकडून पाठविण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील १०२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून १५६ शेतकरी बाधित झाले आहेत, त्यासाठी १२ लाख ५४ हजार २८५ रुपये इतके नुकसान भरपाई लागणार आहे. माळशिरस तालुक्यातील ५१२ हेक्टरवरील पिके बाधित झाले असून, ९७१ शेतक-यांना फटका बसला आहे. ९० लाख १७ हजार ३९० रुपये निधी अपेक्षित आहे.