धान्य मोजण्याची जुनी साधणे नामशेष होण्याच्या मार्गावर..!

धान्य मोजण्याची जुनी साधणे नामशेष होण्याच्या मार्गावर..!
पारपारिक वजनाची साधने आणि कारागिरी जपण्याची गरज
सांगोला (दिलीप घुले): आजच्या वेगवान जगात, अन्न, वस्तू आणि साहित्य मोजण्यासाठी डिजिटल स्केल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने किलोग्रॅम, ग्रॅम, पौंड आणि न्यूटन सारखे शब्द सामान्य झाले आहेत. तथापि, पारंपारिक धान्य मोजमाप यंत्रांमागे एक समृद्ध इतिहास आहे जो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. धान्य आणि अन्नपदार्थ मोजण्याच्या युगाला उजाळा देणारी एक कला होती. संस्कृती आणि परंपरेत अंतर्भूत असलेली ही लुप्त होणारी कला आज लक्ष देण्यास पात्र आहे.
एकेकाळी ज्वारी, गहू, बाजरी, मटकी, हुलगे आणि तांदूळ यांसारख्या धान्यांचे मोजमाप करण्यासाठी वापरली जाणारी हस्तनिर्मित साधने होती. त्याच्या निर्मितीमागील कलात्मकता आणि कारागिरी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. दुर्दैवाने, आधुनिक डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्केलच्या आगमनाने, अशा पारंपारिक मोजमाप यंत्रांची मागणी कमी झाली आहे. या घसरणीचा परिणाम एकेकाळी त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्या कलाकृतीवर अवलंबून असलेल्या कारागिरांवर झाला आहे. तराजू आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक मापन उपकरणे लोकप्रिय होण्यापूर्वी, लोक धान्य आणि इतर आवश्यक वस्तू मोजण्यासाठी पायली सारख्या हस्तनिर्मित अवजारांचा वापर करत असत. ही अवजारं कारागिरांच्या कौशल्याचे प्रदर्शन करणारी अचूकता आणि काळजी घेऊन तयार केली जात होती.

जुन्या व्यापार आणि देवाणघेवाणीच्या पद्धतींप्रमाणेच धान्य मोजण्याची साधने तयार करण्याची आणि वापरण्याची परंपरा हळूहळू नाहीशी होत चालली आहे. ही साधने तयार करणाऱ्या कलाकारांना आता त्यांच्या कामासाठी कमी होत चाललेली बाजारपेठ भेडसावत आहे आणि त्यांना रोजगाराच्या पर्यायी पद्धतींचा विचार करावा लागत आहे. पूर्वी धान्य हेच मुख्य विनियोगाचे साधन होते. कुठलाही व्यापार हा धान्याच्या मोबदल्यात केला जायचा. त्यामुळे धान्य आणि इतर वस्तू मापनासाठी शेर, पावशेर, अस्तेर ही मापनाची मूलभूत यंत्रणा सिद्ध झाली. तिचा वापर धान्यासोबतच इतरही वस्तू मापनासाठी अर्थातच होऊ लागला. इंग्रजी मेट्रीक पद्धतीची वजनमापे अवतरण्या अगोदरपर्यंत हीच मापनपद्धती सर्वत्र वापरात होती. पूर्वी मूलभूत माप होते शेर, त्यानंतर आधेलं. ही लोखंडी धातूपासून बनवलेली भांड्याच्या आकाराची गोलाकार मापे होती. त्यामध्ये धान्य भरून मापले जात होते. पुढील माप त्या पटीत ठरत होते.
धान्य मोजण्याचे पहिले माप शेर, त्यानंतर आधेलं, चौथं, डोळं, पायली आणि पोतं, पोतं म्हणजे एक क्विंटल. शेर एक किलोचा, आधेलं दोन शेराचं, चौथं दोन आधेलंचं, डोळ्यामध्ये चार चौथे आणि चार डोळ्याचं पोतं. धान्य मोजण्याची शेराच्या खालची मापेही होती. नकटं, चटकं, आठकं, पावशेर, आस्तेर आणि शेवटी शेर. पूर्वीच्या काळात किराणा सामानाच्या दुकानांमध्ये छटाक, आतपाव, कच्चा पाव, पाव, अर्धा किलो, किलो असा हा प्रवास होता. छटाक म्हणजे ५० ग्रॅम, २० ग्रॅमचा अर्धा छटाक, आतपाव म्हणजे शंभर ग्रॅम, दोनशे ग्रॅमचा कच्चा पाव तर २५० ग्रॅमचा पक्का पाव. जुन्या काळात धान्य मोजण्यासाठी विविध प्रकारची मापं वापरली जायची. त्यामध्ये नेळवी, कोळवी, चिपटं, मापटं, शेर, अडसरी, पायली, मण, खंडी ही प्रमुख मापं होती.
चौकट १
धान्य मोजण्याची पूर्वीची मापं
दोन नेळवी = एक कोळवी
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडसरी
दोन अडसऱ्या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी
चौकट २
प्रमाण आणि अंदाजे वजन:
पायली = सात किलो
अर्धी पायली (आडसरी) = 3.5 किलो
शेर = दोन किलो
मापटं = एक किलो
चिपटं = अर्धा किलो
कोळव = पाव किलो
नेळव = 125 ग्रॅम
चिळव (छटाक) = 50 ग्रॅम



