४३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अशांक चांदणे यांच्यावर गुन्हा दाखल
बिगर शेतीबाबतचा बनावट व खोटा आदेश दाखवून जमिनीची विक्री

४३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अशांक चांदणे यांच्यावर गुन्हा दाखल
बिगर शेतीबाबतचा बनावट व खोटा आदेश दाखवून जमिनीची विक्री
सांगोला (प्रतिनिधी): बिगर शेतीबाबतचा बनावट व खोटा आदेश खरा असल्याचे भासवून मूळ शेतजमीन मालकाने खरेदीदारांचा विश्वास संपादन करून वासूद व सांगोला हद्दीतील दोन गटांतील मिळून सुमारे २ हेक्टर १७ आर जमीन खरेदी दस्ताने विक्री करून तिघांची सुमारे ४३ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १० ते २२ फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान सांगोला येथे घडली. याप्रकरणी गौरव सुनील चांडोले रा. वासूद चौक, सांगोला यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादीवरून पोलिसांनी अशांक बाळकृष्ण चांदणे (रा. वासूद रोड, सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी, अशांक बाळकृष्ण चांदणे रा. वासुद रोड, सांगोला यांची वासुद ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 150/2 मधील क्षेत्र 1 हे 32 आर व गट नंबर 148/2 मधील 0.95.75 हे. आर. ही शेत जमीन विक्री करणार असल्याचे समजल्याने फिर्यादी गौरव सुनिल चांडोले रा. वासुद चौक, सांगोला, सतीश रावसाहेब सावंत, रा. सावंतवस्ती, सांगोला, राहुल शिवलाल बंदपट्टे रा. सांगोला यांनी अशांक चांदणे यांची भेट घेतली. यावेळी अशांक चांदणे यांनी सदरची जमीन तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडुन बिनशेती झाली आहेत असे सांगून दोन वेगवेगळे बिनशेती आदेश दाखविले. अशांक चांदणे यांनी जमीन गट नंबर 150/2 यामध्ये क्षेत्र 1 हे 32 आर यामध्ये 0 हे 12 आर बिनशेती जमीन आहे. बाकी उर्वरीत क्षेत्र 1 हे 20 आर जमीन जिरायत शेतजमीन आहे असा गावकामगार तलाठी वासुद यांनी दाखला दिला आहे असे सांगीतले. तहसिलदार सांगोला यांचेकडील जमिन निवासी प्रयोजनासाठी बिगरशेती आदेश तहसिल कार्यालय सांगोला क्र. जमा/1/एनए /एसआर/11/2006 आणि जमा /1 /एनए /एसआर/10/2006 अशा प्रकारचे कागदपत्र दाखवले होते. त्यावेळी सदर जागेचा व्यवहार ४३ लाख रुपयांना ठरल्यानंतर तिघांनी सर्व रक्कम अशांक चांदणे यांना दिली.
दरम्यान तहसिल कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयात सदर जमिनीच्या कागदपत्राबाबत मागणी केली असता सदरचे आदेश अभिलेखावर आढळून येत नाहीत असे लेखी कळविले. तसेच उपअधिक्षकभुमी अभिलेख सांगोला यांचेकडे गटाची शासकीय मोजणी, मंजुर ले आउट बाबतचे कागदपत्राची लेखी मागणी केली असता सदर दोन्ही गटाची हद्द कायम तसेच पोट हिस्सा व बिनशेती मोजणी सन 2005 ते आजतागायत झालेली दिसून येत नाही असे लेखी कळविले.
त्यामुळे अशांक बाळकृष्ण चांदणे रा. वासुद रोड, सागोला यांनी त्याचे मालकीची वासुद येथील शेतजमीन गट नंबर 150/2 चे जमिन निवासी प्रयोजनासाठी बिगरशेती आदेश तहसिल कार्यालय सांगोला क्र. जमा/1/एनए /एसआर/ 11/2006 सांगोला दिनाक 15/06/2006 व गट नंबर 148/2 यांचे जमिन निवासी प्रयोजनासाठी बिगरशेती आदेश तहसिल कार्यालय सांगोला क्र जमा एनए /एसआर/10/2006 सांगोला दिनांक 15/06/2006 असा तहसिल कार्यालय सांगोला याचे कार्यालयाकडील बनावट आदेश तयार केला. तो बिनशेती झाले बाबतचा बनावट व खोटा आदेश खरा आहे असे भासवून त्या आधारे विश्वास संपादन करून सदरची जमीन फिर्यादी गौरव सुनिल चांडोले रा. वासुद चौक, सांगोला, सतीश रावसाहेब सावंत, रा. सावंतवस्ती, सांगोला, राहुल शिवलाल बंदपट्टे रा. सांगोला यांना ४३ लाख रुपये किमतीस २२ फेब्रुवारी २०२१ रोजी खरेदी दस्ताने विक्री करून फसवणूक केली असल्याचे गौरव सुनील चांडोले रा. वासूद चौक, सांगोला यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

