महाराष्ट्र

विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांसह हलग्यांचा कडकडाट..

विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांसह हलग्यांचा कडकडाट..

लेझर शो ऐवजी फटाक्यांच्या आतिषबाजीला श्री गणेशभक्तांची पसंती

सांगोला (प्रतिनिधी): यंदा राज्यात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नव्हता. तर हलग्यांचा कडकडाट, पारंपरिक वादन, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीभावाने कोट्यावधी भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला. नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला चांगला प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या.

गणेशोत्सव हा उत्साह आणि भक्तीचा सण आहे. यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया. सर्व गणेश मंडळांनी शासनाचे नियम, उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पोलिसांनी श्री गणेश मंडळांच्या बैठकीत केले. या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी, ध्वनिप्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक व्यवस्थापनासह महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या.


श्री गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मोठ्या मंडळांकडून डीजे तसेच लेझर लाईटचा वापर करण्यात येत असतो. मात्र याचा त्रास होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी यावर बंदी करण्यात आली होती. त्यानुसार  विसर्जन मिरवणुक दरम्यान डिजे वाजविण्यावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेझर लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, आदेश लागू असताना देखील विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांकडून डीजे वाजविण्यात आला. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.
यंदा लाडक्या बाप्पाला निरोप देताना काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीला चांगले यश मिळाल्याचे पाहावयास मिळाले. कर्णकर्कश आवाजाला फाटा देत लेझीम, झांज, ढोल, ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप देत गणेश भक्तांनी नवा इतिहास घडवला. पारंपरिक वाद्य व लेझीम, झांज, ढोल, टिपर्‍या वाद्यासह निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


गणपती विसर्जनाचा आत्मा असणारे ढोल ताशा पथक नेहमीच आपल्या ठेक्याने मिरवणूक गाजवत असतात. याही वर्षी ही पथके आपल्या सादरीकरणाने मिरवणूक गाजवण्यासाठी सज्ज झाली होती. पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांना घेऊन हे वादन असल्याने यंदा नवीन काय ऐकायला मिळणार याचीही उत्सुकता मिरवणुकीच्या आधीच सर्वांना लागली होती. दरम्यान, यंदा डीजेला बंदी असल्याने ढोल ताशा पथक, हलगी पथक यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले. एकीकडे डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आपण बघतो. तर दुसरीकडे ढोलाच्या ठेक्यावर आणि ताशाच्या तर्रीवर मिरवणूक डोलावणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात दरवर्षी सहभागी होताना दिसते. दिवसेंदिवस तरुणाईचा ढोल पथकात सहभागी होण्याकडे कल वाढला आहे.
अनेक सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमवाली आहे. डीजे सुरू असताना अनेकांच्या ह्रदयाचे ठोके वाढल्याचे प्रकारही वारंवार निर्दशनास आले आहेत. लेझर लाईट, कार्बन डायऑक्साइडचा वापर होणारे फवारे (स्मोकर), दबाव हॉर्न (प्रेशर मिड) यावर बंदी घातली आहे. तर मिरवणुकीत कर्णकर्कश आवाज करणारी डीजे सिस्टीम वाजवल्यास ती जप्त करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता. डीजेच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो. आरोग्याच्या निगडीत गंभीर समस्या निर्माण होतात. काहींना कानाचा, ह्रदयाचा त्रास होऊन कायमचे अंपगत्व येते. तर, काहींच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे यंदा मिरवणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी महत्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!