आरक्षणासाठी मराठ्यांचा मुंबईला वेढा…सरकार कसा सोडवणार तिढा..?
मनोज जरांगें पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, गावागावातून चटणी भाकरी मुंबईला रवाना

आरक्षणासाठी मराठ्यांचा मुंबईला वेढा…सरकार कसा सोडवणार तिढा..?
मनोज जरांगें पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, गावागावातून चटणी भाकरी मुंबईला रवाना
महाराष्ट्रात शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाचा वेगळा टप्पा सुरु झाला. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू आहे. उभ्या मुंबईला मराठ्यांचा वेढा आणि शहरामध्ये मराठ्यांची छावणी पडल्यासदृश्य परिस्थिती पहावयास मिळत असून मुंबईत वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे जरांगे उपोषणस्थळी पोहचताच मोर्चेकर्यांना सूचना देताना कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. आंदोलनाला गालबोट लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे. पण आता मागे हटायचे नाही, मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं नाही, असा निर्धार व्यक्त करत कोण काय सांगतय, कोण राजकीय पोळी भाजतय यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतय का, हे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना संघर्षयोद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित मोर्चेकर्यांना दिल्या आहेत.
आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय येथून उठणार नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आता जेलमध्ये जावे लागले तरीही चालेल, पण आमरण उपोषण थांबणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस असून मराठा आंदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सहकार्य केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खाऊ गल्ली, पाणी, बाथरूम बंद करण्यात आल्याने मराठा आंदोलकांनी रस्त्यावर आंघोळी केल्या. सकाळचे नाष्टा रस्त्यावर बनविला. त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप पहावयास मिळत आहे. दुसरीकडे मुंबईत आंदोलकांचे हेळसांड पाहून आता अवघ्या महाराष्ट्रभरातून मराठे आंदोलकांची व्यवस्था लावण्यासाठी पुढे सरकत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, अनेक ठिकाणावरून बेसन भाकरी, चटणी भाकरी घेवून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार, आयुक्तांनी आमच्या मराठा आंदोलकांचे पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकाने बंद केली. बीएमसी आणि सीएसएमटीच्या परिसरात जमलेल्या आंदोलकांना विनंती आहे की, हे मुद्दाम केले जात आहे, पण तुम्ही संयम सोडू नका. तुमचे हाल होत आहेत, तर थोडे हाल होऊ द्या. मी पोलिसांना सांगतो की, पोरांना डिवचू नका. विनाकारण ताण देऊ नका. आपलीही वेळ येईल, तेव्हा गोष्टी आपल्याप्रमाणे घडवून आणू, असेही जरांगे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. सुरुवातीला त्यंना फक्त २९ ऑगस्ट या एका दिवसासाठीच परवानगी मिळाली होती. पण त्यांना आंदोलनासाठी आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. आंदोलकांना सुविधा मिळत नसल्याने आंदोलक सरकारवर संतप्त झाले आहेत. आझाद मैदानच्या जवळी खाऊगल्ल्या, हाॅटेल बंद ठेवण्यात आले आहेत. त्यावरून मनोज जरांगेंनी हा देवेंद्र फडणवीसांचा डाव असल्याचे म्हटले आहे. मराठा आंदोलकांना आवाहन करताना जरांगेनी आपल्या प्रकृतीची अपडेट देखील दिली. मनोज जरांगे पाटील बोलत असताना त्यांचा आवाज देखील खोल गेला होता. सरकारला सहकार्य करा, असे आवाहन देत आंदोलकांना करत होते. रस्ता आडवू नका, पोलिसांनी जी जागा दिली आहे तेथे वाहने पार्क करण्याचे देखील ते सांगत होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शनिवारी माजी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅझिटियरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली. तर शिंदे समितीकडून सहा महिन्यांचा वेळ मागितला. मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित करा त्याशिवाय इथून उठणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच हैदराबाद गॅझेटसंदर्भात तत्वत: मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे, अशी महत्वाची माहिती शिंदे समितीने दिली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केल्यावर न्यायमूर्ती शिंदे आणि समितीमधील सदस्य पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यात माजी न्यायमूर्ती शिंदे व इतर सदस्य उपस्थित होते.हैद्राबाद आणि सातारा संस्थानच्या गॅझेट जाहीर करण्याबाबत मी सरकारशी बोलतो. मुंबई, औंध नंतर बघण्यात येईल. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कालावधी देण्यात यावा, अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे यांनी केली. मात्र, त्यावर वेळ वाढवून देण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. त्यामुळे जरांगे पाटील आणि शिंंदे समितीमधील बोलणी अयशस्वी ठरली आहे. मराठा समाजाला कुणबी जाहीर केल्याशिवाय आता मी माघार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. हैदराबाद गॅझिटची अमलबजावणी करण्यात यावी, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन आणि राज्यात सुरू असलेला गणेशोत्सवामुळे सर्व पोलिसांच्या रजा तडकाफडकी रद्द करण्यात आल्या असून सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील मराठा आंदोलकांचा मुक्काम वाढला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नसल्याचं आंदोलकांनी ठरवलं आहे. मात्र, आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल आणि जेवणाचे स्टॉल्स बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांचे मोठे हाल होत आहेत. अशातच आता मराठा आंदोलकांनी मराठा बांधवांसाठी नाश्त्याची सोय केल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारने शौचालयाचे कुलुप लावून दारे बंद केली, पाण्याची परिस्थिती तीच आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की, चहा, नाश्ता आणि जेवणाची दुकानेदेखील बंद केली. आंदोलकांना जेवायला मिळू नये, चहापाणी मिळू नये आणि मराठ्यांनी वैतागून निघून जावे, असे प्रयत्न आहेत. तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार झाले, असा घणाघात मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठे विसरणार नाहीत. जर त्यांनी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिले, तर माझा गरीब मराठा मरेपर्यंत ते विसरणार नाही’, असे जरांगे म्हणाले. तुम्ही एक-एक दिवस परवानगी दिली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत व अंमलबजावणी होईस्तोवर हे उपोषण होणार आहे. हे आंदोलन मोडायचे की परवानगी द्यायची की मला गोळ्या झाडून मारायचं हे सरकारच्याच हातात आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.