महाराष्ट्र

केळी निर्यातीत कंदर आणि टेंभुर्णी जगाच्या नकाशावर 

आखाती देशांमध्ये ३९ हजार ७२७ कंटेनर केळीची निर्यात, केळी संशोधन केंद्राची गरज

केळी उत्पादनात आणि निर्यातीत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून १२ लाख ४३ हजार ८९९ मे. टन केळीची निर्यात होऊन यातील सुमारे ८ लाख २६ हजार ३२२ मे. टन केळी सोलापूर जिल्ह्यातून एक्स्पोर्ट झाली. राज्यातून होणाऱ्या निर्यातीत सोलापूरचा वाटा सुमारे ६६.४३ टक्के होता. त्यामुळे केळीसाठी हवामान, लागवड यासाठी संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण या दृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची गरज आहे.

       राज्यातील सर्वात मोठे केळी निर्यात केंद्र असलेल्या जळगावला सोलापूर जिल्ह्याने केळी निर्यातीत मागे टाकत एक वेगळी कामगिरी नोंदवली आहे. सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात १५ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन होत आहे. जिल्ह्यातील करमाळा, माढा तालुका हा केळीचे हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. करमाळा तालुक्यातील कंदर व माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरामध्ये देशातील सर्व प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी आपली कार्यालये या परिसरात उघडली आहेत. त्यामुळे केळी निर्यातीबाबत ही दोन गावं जगाच्या नकाशावर उमटली आहेत.

     उजनी धरणातून हमखास पाणी मिळण्याची खात्री असल्यामुळे लाभक्षेत्रातील करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांत केळींची लागवड वाढली आहे. निर्यातीत सोलापूरने जळगावला मागे टाकले आहे. सोलापुरातून इराण, ओमान, दुबई, इराक, सौदी अरेबिया, नेपाळ,रशिया, जॉर्डन येथे केळींची निर्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यांना लाभलेला भीमा नदीचा काठ आणि दुसरीकडे माळशिरस, सांगोला या भागाला मिळालेले म्हैसाळ, टेंभू, नीरा-देवघर, नीरा-भाटघरसारख्या प्रकल्पाचे पाणी हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच या पट्ट्यात आता ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाबरोबर केळीचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.

         जळगावच्या केळींचा देशभरात दबदबा असला तरी, २०१७ पासून सोलापूर जिल्ह्याने केळीच्या निर्यातीत आघाडी घेतली आहे. राज्यातून झालेल्या एकूण केळींच्या निर्यातीत ६६ टक्के हिस्सा एकट्या सोलापूर जिल्ह्याचा आहे. राज्याच्या एकूण निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा वाटा २०१७ मध्ये १ लाख २२ हजार ८७० मे.टन (५३.२० टक्के), २०१८ मध्ये १ लाख ३१ हजार १०९ मे. टन (५४.३२ टक्के), २०१९ मध्ये ८ हजार ०११ कंटेनरच्या माध्यमातून १ लाख ५२ हजार २०९ मे. टन (५६.०८ टक्के), २०२० मध्ये १२ हजार ५९३ कंटेनरच्या माध्यमातून २ लाख ५१ हजार ८६० मे.टन (५६.९१ टक्के), २०२१ मध्ये १८ हजार ०३८ कंटेनरच्या माध्यमातून ३ लाख ६० हजार ७६० मे.टन (५७.१० टक्के), २०२२ मध्ये २७ हजार २६४ कंटेनरच्या माध्यमातून ५ लाख ७२ हजार ५४४ मे. टन (५७.४४ टक्के), २०२३ मध्ये ३४ हजार ०८१ कंटेनरच्या माध्यमातून ७ लाख १५ हजार ७०१ मे. टन (५७.७७ टक्के) तर २०२४ मध्ये ३९ हजार ७२७ कंटेनरच्या माध्यमातून ८ लाख २६ हजार ३२२ मे.टन (६६.४३ टक्के) असा राहिला आहे. दिवसेंदिवस आखाती देशांमध्ये केळीला मागणी वाढत असल्यामुळे भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी संधी केळी पिकासाठी उपलब्ध आहे.

राज्याच्या केळी निर्यातीत ६६ टक्क्यांहून अधिक वाटा असणारा सोलापूर जिल्हा हा एकमेव बनला आहे. देशपातळीवर आता सोलापूरच्या केळी निर्यातीच्या आकडेवारीची दखल घेतली गेली आहे. देशपातळीवर सोलापूरला योग्य स्थान केळी निर्यातीत मिळवण्यासाठी आता सोलापुरात केळी संशोधन व निर्यात केंद्र उभारण्याची गरज आहे. केळी उत्पादकांना लागवड, लागवड पश्‍चात व्यवस्थापन, निर्यात व्यवस्थापन या सर्व मुद्द्यांवर एक संशोधन केंद्र असण्याची गरज आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!