गुन्हेगारी

मंगळवेढ्यात खळबळ! एमआयडीसी परिसरातून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना अटक

जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त, १ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मंगळवेढ्यात खळबळ! एमआयडीसी परिसरातून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना अटक

जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त, १ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मंगळवेढा (प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष मोहिमेंतर्गत मंगळवेढा पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून दोन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे व एक मोटारसायकल असा तब्बल १ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे मंगळवेढा शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यात वाढत्या अवैध शस्त्र व्यवहारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवेढा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी विशेष पथक तयार करून शहर व परिसरात गुप्त माहितीच्या आधारे मोहीम सुरू केली होती.

दरम्यान, पोहेकॉ प्रमोद मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पंढरपूर रोडवरील एका हॉटेल समोरील एमआयडीसी परिसरात दोन इसम देशी बनावटीची पिस्तुले घेऊन येणार आहेत. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास दोन संशयित इसम मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. पोलिसांनी त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवून क्षणार्धात कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. याशिवाय ते वापरत असलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली. याप्रकरणी नाना ज्ञानेश्वर जगताप व कृष्णा महेश खटकाळे दोघेही राहणार मंगळवेढा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीची देशी बनावटीची दोन पिस्तुले, १ हजार ८०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे व ३० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण १ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, चौकशीदरम्यान आरोपींकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही पिस्तुले नेमकी कुठून आणली, कोणाला विक्रीसाठी आणली होती का, अथवा कोणत्या गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्याचा त्यांचा हेतू होता याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील गुन्हेगारी हालचालींचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या प्रकरणी पोहेकॉ प्रमोद मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व ५ प्रमाणे गुन्हा क्रमांक ४१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, सहाय्यक पोलीस फौजदार देडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल पलूसकर, पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पोरे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी संयुक्तरित्या पार पाडली. जिल्ह्यात अवैध शस्त्रे, गावठी कट्टे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरोधात अशीच कठोर मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!