अचकदानीत परदेशी पाहुण्यांची वर्दळ
हजारो मैलांचा प्रवास करून पायमोज वटवट्या सांगोल्यात दाखल

अचकदानीत परदेशी पाहुण्यांची वर्दळ
हजारो मैलांचा प्रवास करून पायमोज वटवट्या सांगोल्यात दाखल
सांगोला (प्रतिनिधी): हिवाळ्याची चाहूल लागताच युरोप, रशिया, सायबेरिया अशा थंड प्रदेशांतून हजारो मैलांचा प्रदीर्घ प्रवास करून भारतीय उपखंडात स्थलांतरित पक्ष्यांचा तांडा दरवर्षी दाखल होतो. प्रचंड हिमवृष्टी, प्रतिकूल तापमान, अन्नाची कमतरता आणि प्रजननासाठी आवश्यक अधिवासात येणारे बदल यामुळे अनेक प्रजाती दक्षिणेकडे स्थलांतर करतात. महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील अचकदानी हे गाव गेल्या दोन दशकांपासून या परदेशी पाहुण्यांसाठी सुरक्षित आणि आकर्षक थांबा ठरले आहे.

अचकदानी परिसरातील वनविभाग परीक्षेत्र, रोपवाटिका, जलाशय आणि गवताळ पट्टे यांचा संगम स्थलांतरित पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास ठरतो. पाणथळीतील राजहंस, चक्रवाक बदके, तलवार बदक, विविध माशीमार आणि थिरथिऱ्या अशा अनेक लहान-मोठ्या प्रजाती येथे दरवर्षी वास्तव्य करतात. याच ठिकाणी यंदाच्या पक्षी सप्ताहानिमित्त (५ ते १२ नोव्हेंबर) सांगोल्यातील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी निरीक्षणादरम्यान पायमोज वटवट्या (Booted Warbler) या दुर्मीळ स्थलांतरित पाहुण्याचे दर्शन घेतले. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेली ही छायाचित्रे सध्या पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकतेचा विषय ठरली आहेत.
पायमोज वटवट्या : लहानशी काया, पण प्रवास हजारो मैलांचा
उत्तर युरोप आणि मध्य आशिया येथील प्रजनन स्थळांवरून हा नाजूक पण अत्यंत चपळ पक्षी भारतात येतो. फिकट तपकिरी अंगरखा, पोटावर पांढरेपणा, डोळ्यांवर कोरलेली भुवईरेषा आणि शेपटीच्या बाहेरील कडांना फिकी पट्टी—हा त्याचा खास देखणा अंदाज. वटवट्या कुळातील या पक्ष्याची चोच बारीक आणि मजबूत असून कीटकभक्षणासाठी उपयुक्त बनलेली आहे. झुडपे, काटेरी वेल आणि गवताळ परिसर हे याचे आवडते अधिवास आहेत.
वॉर्बलर कुळातील बुटेड वॉर्बलर व सायकस वॉर्बलर या अत्यंत साधर्म्य असणाऱ्या प्रजाती महाराष्ट्रात स्थलांतर करून येतात. यामध्ये पायमोज वटवट्या दिसणे हा दुर्मीळ अनुभव असल्याचे अभ्यासक सांगतात.

चक्रीवादळांचा परिणाम… स्थलांतराचे वेळापत्रक बदलताना
अलीकडच्या वर्षांत हवामान बदलाचे दुष्परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावरही स्पष्टपणे जाणवत आहेत. सतत निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे आणि अनियमित चक्रीवादळांमुळे अनेक प्रजाती नेहमीपेक्षा काही आठवडे उशिराने भारतात दाखल होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. सांगोला तालुक्यातील ब्रह्म ओढा, बुद्धेहाळ तलाव, वाढेगाव बंधारा आणि अचकदानी परीक्षेत्र येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशी पाहुणे दिसतात. हे स्थळ पक्षी निरीक्षकांसाठी ‘हॉटस्पॉट’ बनले असून दुर्बिणीतून निरीक्षण आणि छायाचित्रणाची पर्वणी येथे अनुभवायला मिळते.
वन्यजीवप्रेमींचे आकर्षण वाढले
अचकदानी परिसरात सातत्याने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असल्याने सांगोला तालुक्यातील हे गाव आता पक्षी पर्यटन केंद्र म्हणूनही उदयास येत आहे. महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून अनेक नैसर्गिक छायाचित्रकार आणि वन्यजीव प्रेमी दरवर्षी येथे भेट देत आहेत.

प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे म्हणाले,
“हवामानातील बदलामुळे स्थलांतराच्या पद्धतीत स्पष्ट बदल जाणवत आहेत. तरीही अचकदानी परिसरातील जलस्रोत, गवताळ भूभाग आणि शांत वातावरण यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा परिसर आजही आवडता ठरतो.” या छोट्याशा गावात दरवर्षी उमटणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या पंखांच्या तालावर नैसर्गिक विविधतेची अनोखी नोंद उमटते आहे. सांगोल्याच्या जैवविविधतेची ही एक समृद्ध आणि हृदयस्पर्शी कहाणी ठरत आहे.



