
लक्ष्मीनगरला एस.टी. सेवेची प्रतीक्षा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सांगोला–अकलूज मार्गावरील बसफेऱ्या लक्ष्मीनगरमार्गे वळविण्याची मागणी; शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय
सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे लक्ष्मीनगर (दंडाचीवाडी) येथे नियमित एस.टी. बससेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगोला आगार प्रमुखांकडे निवेदन सादर केले आहे. गावात नियमित एस.टी. सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना महूद, सांगोला तसेच अकलूज या प्रमुख ठिकाणी शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ, शासकीय कामकाज व इतर दैनंदिन गरजांसाठी वारंवार प्रवास करावा लागतो. मात्र गावात नियमित एस.टी. बससेवा नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडाबरोबरच वेळेचे नुकसान आणि प्रवासाची गैरसोय सहन करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सांगोला–अकलूज बसफेरी लक्ष्मीनगरमार्गे सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी सांगोला आगाराकडे सकाळी सांगोला ते अकलूज अशी एक बसफेरी लक्ष्मीनगरमार्गे सुरू करण्याची मागणी केली आहे. ही बस एखतपूर, सोनलवाडी, ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर, महूद मार्गे अकलूज येथे जावी आणि त्यानंतर याच मार्गाने परतीची फेरी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच दुपारी तीननंतर याच मार्गावरून सांगोला–अकलूज व अकलूज–सांगोला अशी दुसरी फेरी सुरू करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या दोन फेऱ्या सुरू झाल्यास लक्ष्मीनगरसह परिसरातील अनेक गावांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. सांगोला आगाराच्या सांगोला–दिघंची तसेच सांगोला–खवासपूर या मार्गावरील बसफेऱ्यांपैकी काही फेऱ्या लक्ष्मीनगरमार्गे वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गावर ठोंबरेवाडी, शिंदे चौक, गोडसेवस्ती, लक्ष्मीनगर, नरळेमळा, बाड मळा आणि अचकदाणी या मार्गाने बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नियमित एस.टी. सेवा नसल्याचा सर्वाधिक फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अनेक वेळा प्रवासाचे वेळापत्रक जुळत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींनाही सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचबरोबर उपचारासाठी दवाखान्यात जाणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बाजारहाटासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
लक्ष्मीनगर ग्रामस्थांनी यापूर्वीदेखील एस.टी. बससेवा सुरू करण्याबाबत आगार प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. मात्र अद्यापपर्यंत मागणीची अपेक्षित पूर्तता झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.“एस.टी. सेवा आमच्या गावासाठी अत्यावश्यक आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन बससेवा सुरू करावी. अन्यथा आगामी काळात ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे आता सांगोला आगार प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष्मीनगर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर लक्ष्मीनगर येथील अनेक ग्रामस्थांच्या सह्या असून, कैलास हिप्परकर, सुखदेव करांडे, हनुमान पांडुरंग आटपाडकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. निवेदनासोबत ग्रामस्थांच्या सह्यांची यादीही जोडण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी मूलभूत वाहतूक सुविधा अत्यंत महत्त्वाची असून, लक्ष्मीनगरला नियमित एस.टी. बससेवा मिळणार का? याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



