यशोगाथा

कुस्ती : ‘महाराष्ट्र केसरी’चे रिंगण….गेल्या 58 वर्षातील ‘महाराष्ट्र केसरी’चे मानकरी

कुस्ती : ‘महाराष्ट्र केसरी’चे रिंगण….गेल्या 58 वर्षातील ‘महाराष्ट्र केसरी’चे मानकरी

‘कुस्तीची पंढरी’ अशी ओळख कोल्हापूरला लाभलेली आहे. करवीरनगरीच्या तांबड्या मातीत देश-विदेशातले लाखो मल्ल घडले आहेत. या कुस्तीला शाहू महाराजांनी राजाश्रय दिला, तालमी उभारल्या, खासबागसारखं प्रख्यात मैदान बांधलं. महाराष्ट्र व कुस्ती हे नाते फार प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उघड्यावर असणारे कुस्तीचे आखाडे चार भिंतींच्या आत बंद केले, ज्याला तालीम म्हटले जाऊ लागले. या तालमीत पुढे लाठी-काठी, भाला, तलवार इत्यादी आयुधे व कुस्तीचा सराव केला जात असे.

राजर्षी शाहू महाराजांनी हीच कुस्ती आपल्या उदार आश्रयाखाली कोल्हापुरात वैभवास आणली. नव्या तालमी बांधल्या. कुस्तीसाठी खासबाग मैदान बांधले. पैलवानांना खुराक स्वतःच्या संस्थानातून सुरू केला. पुढे ठेकेदारी पद्धत येऊन कुस्त्या होऊ लागल्या. लाखो लोक तिकिटे काढून कुस्त्या बघायला जाऊ लागले. देश स्वतंत्र झाला आणि 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा दादासाहेब जाधव यांनी इतिहास रचला. देशासाठी पहिले-वहिले पदक जिंकून महाराष्ट्रातील-देशातील मल्लांपुढे एक आदर्श निर्माण केला. खाशाबांच्या कामगिरीनंतर मामासाहेब मोहोळ या कुस्तीवेड्या अवलियाने महाराष्ट्राच्या मल्लांसाठी काहीतरी ध्येय असावे म्हणून पैलवानांची संघटना स्थापन केली, ज्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नाव देण्यात आले. 1952 ते 1962 तमाम पैलवान एकत्र येऊन मेळावे घेतले जाऊ लागले.
1962 साली मात्र या मेळाव्याचे रूपांतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झाले. 1962 पासून अव्याहतपणे ही स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक घराणी या स्पर्धेत खेळली, मोठी झाली. आजमितीला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ऑलिम्पिकइतके महत्त्व महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी आणले आहे.

हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, रुस्तुम-ए-हिंद दादू चौगुले यांसारखे मातीच्या कुस्तीत बलाढ्य असणारे महाराष्ट्राचे मल्ल पुढे राष्ट्रकुल, आशियाई, जागतिक कुस्ती स्पर्धेपर्यंत गेले. अशा मानाच्या स्पर्धेत त्यांनी पदके मिळवली. त्यांचा आदर्श समोर ठेवत महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीने मार्गक्रमण केले पाहिजे.
महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांनी आपल्यासमोर घातलेले महाराष्ट्र केसरीचे रिंगण लांघून आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारणे काळाची गरज आहे. हरिश्चंद्र बिराजदार यांनी पुण्यात गोकुळ वस्ताद तालमीच्या माध्यमाने केवळ मातीतले मल्ल नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडवले. त्यांच्या शिष्यानी ही परंपरा पुढे आणली. काकासाहेब पवार यांनी एशियन गेम्स, जागतिक व ऑलिम्पिक्सपर्यंतचा प्रवास केला. त्यांचे दुसरे शिष्य राहुल आवारे यांनी राष्ट्रकुल, जागतिक ऑलिम्पिक्सपर्यंत मजल मारली. महाराष्ट्र सध्या नक्कीच बदलाच्या उंबरठ्यावर आहे.

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील माती व मॅट विभागातील सर्वोच्च मानाची कुस्ती स्पर्धा आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरुवात 1961 मध्ये कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकारानं झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत विजेत्याला मानाची ‘गदा’ व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येतं. पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही 1961 मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडली होती. या स्पर्धेचे पहिले मानकरी दिनकर दह्यारी ठरले होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा माती आणि मॅट अशा दोन्ही प्रकारांत खेळवली जाते. यात विविध वजनी गटातील मल्ल अंतिम लढतीसाठी पात्र ठरतात. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेत्या पैलवानांमध्ये महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होते. ही अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅटवर घेतली जाते. अखेर या लढतीमधील अंतिम विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ बनतो. त्या मल्लास महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल करण्यात येते.

महाराष्ट्र केसरी या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहीली महाराष्ट्र चँपियन स्पर्धा १९५३ साली झाली. त्यावेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पैलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचाच सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनीटात झोळी डावावर चीतपट मारले. पै.तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चँपियन (केसरी) ट्रॉफी देण्यात आली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते –

1961- औरंगाबाद- दिनकर दहय़ारी
1962- धुळे- भगवान मोरे
1963- सातारा- स्पर्धा रद्द
1964- अमरावती- गणपत खेडकर
1965- नाशिक- गणपत खेडकर
1966- जळगाव- दिनानाथ सिंह
1967- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
1968- अहमदनगर- चंबा मुतनाळ
1969- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
1970- पुणे- दादू चौगुले
1971- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
1972- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
1973- अकोला- लक्ष्मण वडार
1974- ठाणे- युवराज पाटील
1975- चंद्रपूर- रघुनाथ पवार
1976- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
1977- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
1978- मुंबई- आप्पासाहेब कदम
1979- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
1980- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
1981- नागपुर- बापू लोखंडे
1982- बीड- संभाजी पाटील
1983- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
1985- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
1986- सोलापूर- गुलाब बर्डे
1987- नागपुर- तानाजी बनकर
1988- अहमदनगर- रावसाहेब मगर
1989- वर्धा- अनिर्णित
1990- कोल्हापूर- अनिर्णित
1991- अमरावती- अनिर्णित
1992- पुणे- आप्पालाल शेख
1993- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
1994- अकोला- संजय पाटील
1995- नाशिक- शिवाजी केकान
1996- स्पर्धा रद्द
1997- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
1998- नागपुर- गोरखनाथ सरक
1999- पुणे-  धनाजी फडतरे
2000- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
2001- नांदेड- राहुल काळभोर
2002- जालना- मुन्नालाल शेख
2003- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
2004- वाशी- चंद्रहास निमगिरे
2005- इंदापूर, पुणे- सईद चाउस
2006- बारामती, पुणे- अमोल बुचडे
2007- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
2008- सांगली- चंद्रहार पाटील
2009- सांगवी, पुणे- विकी बनकर
2010- रोहा, रायगड- समाधान घोडके
2011- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
2012- गोंदिया- नरसिंग यादव
2013- भोसरी- नरसिंग यादव
2014- अहमदनगर- विजय चौधरी
2015- नागपुर- विजय चौधरी
2016- वारजे, पुणे- विजय चौधरी
2017-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
2018- जालना- बाला रफिक शेख
2019- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर
2020- स्पर्धा रद्द
2021- स्पर्धा रद्द
2022- कोथरुड, पुणे- शिवराज राक्षे (महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ) (14 जानेवारी 2022)
2022- सातारा- पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) (9 एप्रिल 2022)
2023- फुलगाव, पुणे- सिकंदर शेख (महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ) (10 नोव्हेंबर 2023)
2023- वर्धा- शिवराज राक्षे (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) (20 नोव्हेंबर 2023)
2024- स्पर्धा रद्द
2025- अहिल्यानगर- पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ) (02 फेब्रुवारी 2025)
2025- कर्जत जामखेड, अहिल्यानगर- वेताळ शेळके (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) (30 मार्च 2025)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला १९६१ साली सुरुवात झाली. २०२२ वर्षापर्यंत या स्पर्धेचे ५५ मल्लांनी चांदीची गदा पटकावली आहे. नरसिंग यादव व विजय चौधरी यांनी ही गदा प्रत्येकी तीन वेळा मिळवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!