चालकानेच रचला अडीच लाखांच्या दरोड्याचा कट; बनाव उघड, चौघेजण पोलिस कोठडीत
मित्रांना दिली रोकड असल्याची टीप; थारमधून पाठलाग करून बनावट दरोडा — पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य उघड

चालकानेच रचला अडीच लाखांच्या दरोड्याचा कट; बनाव उघड, चौघेजण पोलिस कोठडीत
मित्रांना दिली रोकड असल्याची टीप; थारमधून पाठलाग करून बनावट दरोडा — पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य उघड
सांगोला (प्रतिनिधी): गाडीत अडीच लाख रुपये असल्याची माहिती स्वतः चालकानेच आपल्या मित्रांना देऊन दरोड्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना सांगोला पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. भररस्त्यात थार गाडीतून आलेल्या चौघांनी कार अडवून रोकड लुटल्याचा प्रकार घडला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत चालकासह चौघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप भागोजी पाटील (वय ५८, रा. भोगम कॉलनी, चिंचवड, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे कोल्हापूर २१ मार्च रोजी ते पत्नी सत्यकला पाटील व चालक रामचंद्र साळुंखे यांच्यासह इर्टिगा (MH-09-JU-0371) कारने लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी जात होते. बांधकाम खर्चासाठी त्यांनी २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम सोबत घेतली होती. प्रवासादरम्यान रात्री सुमारे १० वाजता सांगोला हद्दीतील एका हॉटेलवर ते जेवणासाठी थांबले. त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू केला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सांगोला-पंढरपूर रोडवर पुलाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या विनानंबर थार गाडीने अचानक कट मारून कार अडवली. थारमधून उतरलेल्या चार इसमांनी चालक व फिर्यादी यांच्याशी वाद घालत दमदाटी सुरू केली. झटापटीदरम्यान दोन जणांनी कारची डिकी उघडून कपड्यांच्या बॅगा हिसकावून घेतल्या. तसेच चालकाचे दोन मोबाईल फोनही जबरदस्तीने काढून घेतले. काही क्षणातच चौघे आरोपी थार गाडीत बसून सोलापूरच्या दिशेने पसार झाले. लुटलेल्या बॅगेत २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड व एटीएम कार्ड असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे वापरलेली थार गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कोल्हापूर येथे छापा टाकून थार गाडीचा मालक गौशपाक उर्फ मुन्ना अब्दुलरजाक जमादार (रा. कोरोची, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर तपासात सर्वात मोठा धक्कादायक खुलासा झाला. फिर्यादींचा चालक रामचंद्र बापू साळुंखे (वय ४५, रा. मांगले ता. बत्तीस शिराळा, सध्या वळीवडे ता. करवीर) यानेच गाडीत मोठी रक्कम असल्याची माहिती आपल्या मित्रांना देऊन दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले. त्याच्या साथीदारांनी बनावट दरोडा घालून पैसे लुटल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
या गुन्ह्यात पोलिसांनी गौशपाक उर्फ मुन्ना अब्दुलरजाक जमादार रा. कोरडी कोल्हापुर, फिर्यादीचा ड्रायव्हर रामचंद्र बापू सांळुखे वय ४५ वर्षे, रा. गणेशनगर मांगले ता. बत्तीस शिराळा जि. सांगली, सध्या रा. वळीवडे ता. करवीर जि. कोल्हापूर, संदिप बाबासो मेडगुळे वय ३६ वर्ष रा. शिवाजीनगर कोरोची ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, महेश मारूती कांबळे वय ३८ वर्षे रा. उचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर यांना अटक केली. २६ मार्च रोजी त्यांना सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशान्वये पोउपनि चंद्रकांत पुजारी, पोउपनि सागर पाटील, पोहेकॉ मच्छिंद्र राजगे, पोहेकॉ दत्ता बजाळे, पोहेकॉ अस्लम काझी, पोकॉ लक्ष्मण वाघमोडे, पोकॉ अगर पाटील तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ राहुल सोनकर यांनी सदरची कारवाई केली आहे.



