सामाजिक

सांगोल्यात महावितरणचा धडाका! ३.३५ कोटींची वसुली; ३५७३ ग्राहकांकडे १ कोटी थकबाकी

७ पथकांची धडक मोहीम; १३,७२४ स्मार्ट मीटर बसवले; मार्चअखेर अंतिम मुदत

सांगोल्यात महावितरणचा धडाका! ३.३५ कोटींची वसुली; ३५७३ ग्राहकांकडे १ कोटी थकबाकी

७ पथकांची धडक मोहीम; १३,७२४ स्मार्ट मीटर बसवले; मार्चअखेर अंतिम मुदत

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कंपनीने सांगोला उपविभागात थकीत व चालू वीजबिल वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवत ३ कोटी ३५ लाख रुपयांची वसुली केली आहे. मात्र अजूनही ३५७३ ग्राहकांकडे सुमारे १ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने थकबाकीदारांवर कडक भूमिका घेतली असून मार्चअखेरपर्यंत बिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा उपविभागीय अभियंता गणेश पोवार यांनी दिला आहे
सांगोला उपविभागात एकूण २८ हजार ८२४ वीजग्राहक असून त्यामध्ये २४ हजार ४०१ घरगुती, ३ हजार ४१८ व्यावसायिक व ५५१ औद्योगिक ग्राहक आहेत. या ग्राहकांकडील चालू वीजबिलाची रक्कम सुमारे ३ कोटी ९३ लाख रुपये होती. विशेष वसुली मोहिमेद्वारे त्यापैकी ३ कोटी ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले असून उर्वरित ५९ लाख रुपयांसाठी कडक मोहीम सुरू आहे.

वाडीवस्तीवर धडक; घरपोच नोटिसा
थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सांगोला उपविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ६ पथके तसेच पंढरपूर विभागाचे १ पथक अशा एकूण ७ पथकांकडून घरपोच गाठीभेटी घेतल्या जात आहेत. थकीत बिल असलेल्या ग्राहकांना नोटिसा देणे, तातडीने बिल भरण्याच्या सूचना करणे व न भरल्यास तत्काळ वीज तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

१ कोटी थकबाकी; कारवाईची तयारी
उपविभागातील ३ हजार ५७३ ग्राहकांकडे सुमारे १ कोटी रुपये थकीत असून ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने मोहीम अधिक तीव्र केली आहे. थकबाकी न भरल्यास कनेक्शन तोडणे, दंड आकारणे व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्मार्ट मीटर बसवण्यात वेग
सांगोला उपविभागातील २८ हजार ८२४ पैकी १३ हजार ७२४ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून उर्वरित १५ हजार १०० ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक रीडिंग मिळणार असून बिलातील त्रुटी, तक्रारी व वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे.

व्हॉट्सअँपवर मिळणार वीजबिल
महावितरणने ग्राहकांसाठी डिजिटल सुविधा सुरू केली असून नोंदणीकृत मोबाईलवरून 9167777721 या क्रमांकावर Hi पाठवल्यास वीजबिल पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. त्यामुळे बिल न मिळाल्याची सबब ग्राह्य धरली जाणार नाही. घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापर केल्यास प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळणार असल्याने स्मार्ट मीटर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरणकडून ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. ग्राहकांनी आपल्याकडील चालू बिले थकीत न ठेवता प्रत्येक महिन्याला कंपनीच्या कार्यालयात भरुन सहकार्य करावे. जेणेकरून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. – गणेश पोवार, उपविभागीय अभियंता महावितरण, सांगोला

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!