सामाजिक

म्हैसाळ योजनेचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करा ; दिपकआबांच्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली म्हैसाळ योजनांच्या कामाची पाहणी

म्हैसाळ योजनेचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करा ; दिपकआबांच्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली म्हैसाळ योजनांच्या कामाची पाहणी

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. या कामाला माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी भेट देऊन ठेकेदार तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सदरचे काम अपूर्ण असल्याने योजनेच्या पाण्याचा अनेक गावातील नागरिकांना लाभ मिळत नाही. रविवार दि 13 जुलै रोजी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या कामांची पाहणी केली.

म्हैसाळ सिंचन योजनेच्या मूळ प्रकल्पात सांगोला तालुक्यातील पारे, घेरडी व सोनंद या तीनच गावांचा समावेश होता. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी या पाण्यापासून वंचित राहत होता. याबाबत राज्य सरकार आणि संबंधित मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आणखी ८ गावे आणि ४ तलावांचा या योजनेत समावेश केला होता यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र १०० कोटी रुपयांचा निधी दिपकआबांनी विशेष प्रयत्न करून मंजूर केला होता. म्हैसाळ योजनेचे विस्तारीकरण झाले योजनेसाठी निधीही मंजूर झाला परंतु गेल्या काही दिवसांपासून या योजनेचे काम संथ गतीने सुरू होते याबाबत लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपली व्यथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कडे मांडली होती या पार्श्वभूमीवर त्यांनी रखडलेल्या कामांची पाहणी केली.

रविवार दि 13 रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वायफळ ता. जत येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यापासून ते नराळे, हबीसेवाडी, यमगरवाडी, मानेवाडी, घेरडी तसेच वाकी घे वाणिचिंचाळे, जवळा, आगलावेवाडी तरंगेवाडी आलेगाव, मेडशिंगी या परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ही कामे रखडल्याने म्हैसाळ योजनेतून या गावांना पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. या परिसरातील शेतकऱ्यांनी सदरची तक्रार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी घेरडी गावचे माजी सरपंच दिलीप मोटे, भाऊसाहेब यमगर, चंद्रकांत कारंडे, मधुकर करतडे, नामदेव साळुंखे, संजय गायकवाड, सुरेश गावडे, सुखदेव गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार तसेच लाभ क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उर्वरित काम पूर्ण करून तत्काळ पाणी सोडण्याचे आश्वासन

रविवारी दिवसभर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या रखडलेल्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामे पूर्ण झाल्यानंतर लगेचच या योजनेतून बंद पाईपलाईनच्या सहाय्याने पारे, नराळे हबीसेवाडी, हंगीरगे गावडेवाडी, घेरडी, सोनंद या गावांसह वाकी घे, वाणिचिंचाळे, जवळा, आगलावेवाडी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, आलेगाव आणि मेडशिंगी या गावांना लवकरच पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!