सांगोल्यात १७० शाळांची पटपडताळणी, ३९ हजार ६०७ पैकी ३७ हजार ६०५ विद्यार्थी हजर
बोगस पटसंख्येला बसणार आळा; पटपडताळणीला २ हजार २ विद्यार्थी गैरहजर

सांगोल्यात १७० शाळांची पटपडताळणी, ३९ हजार ६०७ पैकी ३७ हजार ६०५ विद्यार्थी हजर
बोगस पटसंख्येला बसणार आळा; पटपडताळणीला २ हजार २ विद्यार्थी गैरहजर

सांगोला (प्रतिनिधी): राज्यातील शालेय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पटपडताळणी मोहिमेला सांगोला तालुक्यात गती मिळाली आहे. शिक्षण विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय पथकांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देत केलेल्या पडताळणीत १७० माध्यमिक शाळांमधील ३९ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ६०५ विद्यार्थी उपस्थित आढळले, तर २ हजार २ विद्यार्थी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद सरल पोर्टलवर करण्यात आल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी दिली.
पटपडताळणी मोहिमेमुळे बोगस पटसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असून, अनेक शाळांमधील वास्तविक विद्यार्थी संख्या उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शिक्षक व संस्थाचालकांची धावपळ वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. संस्थाचालकांचा विरोध डावलत शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता.
सांगोला तालुक्यात जिल्हा परिषदेतर्गत ३८४ प्राथमिक शाळांमध्ये सुमारे १७ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर अनुदानित व विनाअनुदानित ११६ प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ४४ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक शाळांची पटपडताळणी पूर्ण झाली असून त्याची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने यांच्यासह ५८ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष शाळा भेटी देऊन पडताळणी केली. त्यानंतर १५ एप्रिल व २२ एप्रिल रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा टप्पा राबविण्यात आला.
या मोहिमेत ६० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या १७० माध्यमिक शाळांचा समावेश होता. हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने सरल पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. ६० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना या प्रक्रियेत काहीसा दिलासा मिळाला असला तरी खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी १०० टक्के पटपडताळणी बंधनकारक करण्यात आली होती. दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी न करता परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



