सांगोला तालुक्यात काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करणार – सातलिंग शटगार

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहर व तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज कर्मवीर नगर सांगोला येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार होते.
या यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजकुमार पवार, मोतीराम चव्हाण, व्ही.जे. एन.टी.विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, जिल्हा संघटक रमेश हसापूरे, सिद्राम पवार, सांगोला शहर अध्यक्ष तोहीद मुल्ला, अजयसिंह इंगवले -पाटील सुनील नागणे- पाटील, श्रीशैल रणखांबे उपस्थित होते. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार यांनी केले.
याप्रसंगी सातलिंग शटगार सर यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगोला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूरचे निरीक्षक मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तालुका दौऱ्याचे आयोजन केले असून त्यात आज सांगोला तालुक्यात बैठक घेतली. सांगोला तालुका जरी माढा लोकसभा मतदारसंघात असला तरी पुढील काळात निष्ठावंत व पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत. तालुक्यात गण व गट या ठिकाणी नव्याने पक्षाची बांधणी करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत इच्छुक असणाऱ्यांनी आपापल्या प्रभाग, गट, गणात जाऊन वातावरण निर्मिती करावी. आगामी काळात सांगोला तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट झाल्याचे दिसेल असे सातलिंग शटगार यांनी सांगितले.
यावेळी सांगोला तालुक्यात काँग्रेस पक्ष कसा वाढविला जाईल यासाठी जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार, मोतीराम चव्हाण, संघटक रमेश हसापुरे, लक्ष्मण भोसले, सिद्राम पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अजयसिंह इंगवले- पाटील, सांगोला शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, सांगोला कार्याध्यक्ष सुनील नागणे आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस श्रीशैल रणखांबे, चंद्रकांत तमशेट्टी, ज्ञानेश्वर जन्मले, खंडेराव लांडगे, लक्ष्मण सुतार, सिद्धेश्वर देशमुख, पांडुरंग माने, शेखलाल शेख, प्रशांत जावीर, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.