खरीप पाण्यात…पुरामुळे ८८ अन् अतिवृष्टीमुळे २७ गावे बाधित
साडेतीन लाख शेतकऱ्यांना फटका, शेती, माती, पिकांसह अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान

खरीप पाण्यात…पुरामुळे ८८ अन् अतिवृष्टीमुळे २७ गावे बाधित
साडेतीन लाख शेतकऱ्यांना फटका, शेती, माती, पिकांसह अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान
सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा व सीना नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा व सीना नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात जवळपास ७० टक्के खरीप पुराच्या पाण्यात गेला आहे. केवळ पिकेच नाही, तर हजारो हेक्टरवरील जमीनही खरवडून गेली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात शेती, माती, पिकांसह अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील ८८ गावांना पूरस्थितीचा, तसेच २७ गावांना अतिवृष्टीचा जबरदस्त असा फटका बसला आहे. यामुळे जवळपास ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, ३ लाख ५० हजार हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे माणसांसोबत जनावरांचेही हाल सुरू आहेत. १५६ जनावरे दगावली असून, चाऱ्याअभावी जनावरे मरू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय एकूण २१६ टन चारा पुरवठा केला आहे.
जिल्ह्यात सरासरी ४८१ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, यंदा ६८५ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे १४२ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सांगोला, अपर मंद्रुप, तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३ लाख ५० हजार २१६ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले असून, यामुळे ३ लाख ६० हजार ४८७शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील १०३ मोठे पशुधन तसेच ५३ लहान पशुधन मयत झाली आहेत. तर १८ हजार कुक्कुटपालन पक्षी मरण पावले आहेत.
तालुकानिहाय बाधित गावे
माढा २१
करमाळा १८
अक्कलकोट २८
अपर मंद्रुप १५
उत्तर सोलापूर १०
सांगोला २
बार्शी २०
जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजीनगर, तसेच सातारा या परिसरातून चारा मागवला आहे. प्रत्येक तालुक्यात चारा पाठवला असून, चारा वाटप समितीकडून वाटप प्रक्रिया सुरू आहे. पाण्यामुळे सोमवारी रात्री काही गावात चारा पोहोचू शकला नाही. परंतु, मंगळवारी सर्वत्र चारा पोहोचला आहे. कुणीही घाबरू नये. परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मदतकार्य वेगाने सुरू आहे. – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सरासरीच्या दीड पट पाऊस झाल्याने खरीप हंगामातील ७० टक्के क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात सोयाबीन, तूर, उडीद, ऊस आणि कांदा या पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. सोलापूर जिल्हा ज्याला कोरडवाहू म्हणून ओळखलं जातं, जिथं पावसासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतो, त्या जिल्ह्याने यंदा वेगळंच चित्र पाहिलं. पावसाने जणू रौद्ररूप धारण केलं.
शेतं, मळे, घरं, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या सगळं काही पाण्याखाली जाऊन बसलं. शेतकऱ्यांनी स्वप्नवत जपलेलं पीक मातीच्या कुशीऐवजी पाण्याच्या एका लाटेत गडप झालं अन् मागे उरला तो केवळ जगण्यासाठीचा आक्रोश ! अतिवृष्टिग्रस्त भागाच्या दौऱ्यात भेटलेला एकेक शेतकरी पावसात भिजत आपल्या मनाशी बोलतोय “देवा, वर्षानुवर्षं थेंबासाठी आसुसलो होतो, आणि यंदा ओसंडून दिलंस, पण एवढं दिलंस, की अंगण, शिवार, घरं सगळी बुडाली रे. शेतं हिरवी नाहीत आता, त्यांनाही जलसमाधी मिळालीय.” आजअखेर जिल्ह्यात ६०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मे महिन्यातील २०० मिलिमीटर धरला तर ८०० मिलिमीटर पाऊस पडलाय .
सोयाबीन, बाजरी, मका, भाजीपाला कुणाचं पीक पाण्याखाली नाही गेलं? पावसाच्या पाण्यानं धरणीला जीव नाही दिला, तर हळूहळू गुदमरायला लावलं. रस्ते खचले, नाले फुगले, शेतकऱ्यांच्या आयुष्याचं गणितच विस्कटलं. गुणाकार ही नाही अन् भागाकार नाही, अधिकच ही नाही रं आयुष्याचं गणित केवळ वजात गेलंय रं, अशी काहीशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.