कृषी सल्ला

उत्पादकता वाढीसाठी उस लागवड तंत्रज्ञान 

सुधारित जाती, बेणे प्रक्रिया व खतांचा संतुलित वापर, आंतरपिके

आजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस पिकाखालील क्षेत्र वाढीला मर्यादा आहे. त्याऐवजी हेक्‍टरी उत्पादकता वाढविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील (जुलै-ऑगस्ट) पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते. तसेच आडसालीच्या पीक वाढीच्या १६-१८ महिन्याच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. पूर्वहंगामी ऊससुद्धा १४-१५ महिन्यांचा असल्याने त्याचे उत्पादनही चांगले मिळते.

जमीन व पूर्वमशागत  :
मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. किंवा त्याहून खोल) आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची उन्हाळ्यात उभी व आडवी खोल नांगरटीनंतर जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळवाच्या उभ्या- आडव्या पाळ्यानंतर सपाटीकरण करावे. पट्टा पद्धतीसाठी २.५-५ किंवा ३-६ फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी.  ऊस तोडणी यंत्राच्या सहायाने करणार असल्यास दोन ओळीतील अंतर १५० सें.मी. ठेवावे. यामुळे आंतरमशागत ट्रॅक्‍टरने व ऊस तोडणी यंत्राचा वापर सुलभ होतो.

लागवडीचे हंगाम :
आडसाली  :१५ जुलै ते १५ ऑगस्ट.
पूर्वहंगामी  : १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर.
सुरू हंगाम  : १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी.

सुधारित जाती :
आडसाली हंगाम: फुले २६५, को ८६०३२ आणि को व्हीएसआय ९८०५.
पूर्व हंगाम: फुले २६५, को ८६०३२, को ९४०१२, को सी ६७१, को व्हीएसआ ९८०५ आणि व्हीएसआय ४३४.
सुरू हंगाम: फुले २६५, को ८६०३२, को ९४०१२, को ९२००५, को ८०१४, को सी ६७१ को व्हीएसआय ९८०५ आणि व्हीएसआय ४३४.

लागवड : 
लागवडीसाठी मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. आडसाली उसाची लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरताना, दोन टिपरीमधील अंतर १५ ते ३० सें.मी. ठेवावे. लागणीसाठी हेक्‍टरी एक डोळ्याची ३०,००० तर दोन डोळ्यांची २५,००० टिपरी लागतील. एकडोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करताना, ४ फूट अंतरावर सऱ्या काढून दोन रोपांमधील अंतर २ फूट ठेवावे.

सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर :
शेणखत/ कंपोस्ट खत (दुसऱ्या नांगरटीपूर्वी जमिनीत मिसळावे) आडसाली हंगाम :  ३० टन (५० ते ६० बैलगाड्या), पूर्व हंगामी : २५ टन (४० ते ५० बैलगाड्या) प्रमाण प्रति हेक्टर, सुरू हंगाम :  २० टन (३० ते ४० बैलगाड्या). शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास, ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन ४५ ते ५० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे.

आंतरपिके :
आडसाली ऊस : खरीप हंगामातील भुईमूग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला इ. आंतरपिके घेता येतात. भुईमूग हे आंतरपीक घेताना फुले प्रगती, एस. बी. ११, फुले व्यास, फुले, टॅग-२४, टी.जी-२६ या जाती वापराव्यात. सोयाबीन आंतरपीक घेतल्यास जे.एस.-३३५ किंवा फुले कल्याणी या जातींचा वापर करावा.

पूर्व हंगामी ऊस : रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो किंवा हरभऱ्यासारखी आंतरपिके घेता येतात. नेहमीच्या ऊस लागवडीत वरंब्याच्या एका बाजूस तळापासून २-३ अंतर सोडून किंवा पट्टा अथवा जोड ओळ पद्धतीत उसाच्या लागणीनंतर ६-७ दिवसांनी म्हणजेच आंबवणीचे पाणी देण्यापूर्वी आंतरपिकाची टोकण अथवा लागण करावी. हरभरा लागवड करताना वरंब्याच्या माथ्यावर एकाच ओळीत टोकण करावी.

सुरू ऊस : लागवड डिसेंबर महिन्यात केल्यास फ्लॉवर, कोबी, नवलकोल, गवार तसेच मुळा ही भाजीपाला पिके घेता येतात. कोथिंबीर अथवा मेथीसुद्धा घेण्यास हरकत नाही. जानेवारी महिन्यात उसाची लागण करावयाची असल्यास भुईमुगाची एस. बी ११, टॅग-२४ किंवा टी.जी.-२६ या जातींचा वापर करावा. या महिन्यात भेंडी, कांदा, चाऱ्यासाठी चवळी, सोयाबीन, कलिंगड व टरबूज ही पिके घेता येतात. उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूला १०-१५ सें.मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी. या जमिनीच्या सुपिकतेसाठी ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो.

तोडणी व उत्पादन :  आडसाली हंगाम : तोडणी १४ ते १६ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचे हेक्‍टरी २००-२५० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.

पूर्व हंगामी : तोडणी १३ ते १५ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचे हेक्‍टरी १५०-२०० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.

सुरू हंगाम : तोडणी १२ ते १३ महिन्यांनंतर रावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचा वापर केल्यास हेक्‍टरी १२०-१५० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते. को ८६०३२ व कोएम ०२६५ हे वाण अन्य जातीपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यांना प्राधान्य द्यावे.

अगदी अलीकडे निर्माण केलेल्या पाण्याचा ताण व क्षार प्रतिकारक्षम, लालकुज व चाबूक काणी रोगास प्रतिकारक जाती म्हणजे फुले-१५०१२, १३००७ , १५००६. या जातींचा शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रसार झाला आहे.

पर्यावरण पूरक खोडवा व्यवस्थापन ः

– पर्यावरणपूरक खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये कमीत कमी उत्पादन खर्चात, जमिनीचे आरोग्य सुधारून खोडवा उसाचे जादा उत्पादन व साखर उतारा मिळवता येतो. तसेच उसाचे दोनपेक्षा जास्त खोडवा घेण्यासाठी शून्य मशागत, शेतातील उपलब्ध पाचटाचे मूलस्थानी आच्छादन, शिफारशीनुसार रासायनिक खतमात्रा देण्यासाठी पहारीच्या अवजाराचा वापर, ठिबक सिंचनातून फर्टिगेशन, आंतरपिकांचा वापर तसेच एकात्मिक अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आहे.

(स्रोत कृषी विभाग)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!